इंस्टाग्रामवर अमली पदार्थाची विक्री प्रकरणात आणखी चार अटकेत | पुढारी

इंस्टाग्रामवर अमली पदार्थाची विक्री प्रकरणात आणखी चार अटकेत

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने इंस्टाग्रामवर ऑनलाईन अमली पदार्थ विक्री करणार्‍या रिषभ संजय भालेराव (28, शहापूर, जिल्हा ठाणे) या ड्रग्ज पेडलर्सला 7 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली होती. त्याच्या ताब्यातून 64 किलो गांजा, 290 ग्रॅम चरस व 19 बाटल्या चरस ऑइल (हॅश) असा 31 लाखाचा अमली पदार्थ साठा जप्त केला होता. या गुन्ह्यात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 1 किलो 507 ग्रॅम हॅश ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 1 कोटी 83 लाख 34 हजार रुपये आह.

संबंधित बातम्या 

वागळे स्टेट परिसरातील इंदिरानगर भाजी मार्केट येथे एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी इंदिराजगर भाजी मार्केट परिसरात सापळा लावला. यावेळी एका संशयित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 किलो 200 ग्रॅम गांजा मिळून आला.

या प्रकरणी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत गुन्हे शाखेच्या पथकाने रिषभ भालेराव या अमली पदार्थ तस्करास अटक केली होती. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या बदलापूर येथील घरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठा लपवून ठेवल्याचे समोर आले.

Back to top button