… तर सुप्रिया सुळे यांना जशासतसे उत्तर : खासदार सुनिल तटकरे | पुढारी

... तर सुप्रिया सुळे यांना जशासतसे उत्तर : खासदार सुनिल तटकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ;  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषयी बोलताना यापुढे भाषेचा जपून वापर करा, अन्यथा सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या या इशार्‍यावरून लोकसभा निवडणुकीतील प्रचार कोणत्या दिशेने असेल, हे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संबंधित बातम्या 

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी मी स्वतः च उमेदवार आहे, असे समजून लोकसभेला मतदान करा असे आवाहन बारामतीकरांना केले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा यांचा उल्लेख न करता खासदार महिलेने संसदेत बोलले पाहिजे. मी मेरिटवर मते मागते. सदानंद सुळे यांच्यासाठी मते मागायला फिरत नाही. नवर्‍याला संसदेत बसण्यास परवानगी नसते. त्यांना संसदेच्या उपहारगृहात पर्स सांभाळत बसावे लागते. नवर्‍याने पेपरला बसायचे आणि बायकोने पास व्हायचे, असे वक्तव्य करून सुनेत्रा पवार यांना लक्ष केले होते.

यावर तटकरे यांनी जोरदार जोरदार टीका केली. ते म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा विचार सांगणार्यांनी अशा स्वरुपाचे भाष्य करणे हे राजकीय संस्कृतीला अभिप्रेत नाही.आपणही लोकसभेचे सदस्य आहोत. या सभागृहात अनेक महिला खासदार आहेत. पण त्यांच्या पतीना संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत पर्स वागवतानाचे चित्र अद्यापतरी पाहिले नाही. त्यामुळे सुनेत्रा यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य असंस्कृत आहे. राजकीय नैराश्य आल्यामुळेच त्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य केले गेले आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य ठाण्यातील एक नेता करत आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी राजकारणातील भाषा सुधारावी, असा निर्वाणीचा इशारा तटकरे यांनी दिला.

अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील योगदान महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यांच्या भाषण आणि प्रचारामुळे आजपर्यंत राष्ट्रवादीचे अनेकजण आमदार आणि खासदार झालेले आहेत, याचे भान टीका करणार्‍यांनी ठेवावे.

सुनेत्रा पवार या उत्तम वक्त्या असून त्यांचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे. स्थानिक पातळीवर विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून लोकोपयोगी काम त्यांनी उभारलेले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या संसदेतील भवितव्याबाबत सुप्रिया सुळे यांनी चिंता करु नये, अशा कडक शब्दात सुनिल तटकरे यांनी विरोधकांनी समजही दिली.

Back to top button