एक कोटी 83 लाखांचे हॅश ड्रग्ज जप्त; ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटची कारवाई

एक कोटी 83 लाखांचे हॅश ड्रग्ज जप्त; ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटची कारवाई
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने इंस्टाग्रामवर ऑनलाईन अमली पदार्थ विक्री करणार्‍या रिषभ संजय भालेराव (28, शहापूर, जिल्हा ठाणे) या ड्रग्ज पेडलर्सला 7 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली होती. त्याच्या ताब्यातून 64 किलो गांजा, 290 ग्रॅम चरस व 19 बाटल्या चरस ऑइल (हॅश) असा 31 लाखाचा अमली पदार्थ साठा जप्त केला होता. या गुन्ह्यात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 1 किलो 507 ग्रॅम हॅश ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 1 कोटी 83 लाख 34 हजार रुपये असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.

संबंधित बातम्या 

वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर भाजी मार्केट येथे एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. पोलिसांनी 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी इंदिराजगर भाजी मार्केट परिसरात सापळा लावला. यावेळी एका संशयित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 किलो 200 ग्रॅम गांजा मिळून आला. या प्रकरणी वागळे ईस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत गुन्हे शाखेच्या पथकाने रिषभ भालेराव या अमली पदार्थ तस्करास अटक केली होती. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या बदलापूर येथील घरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठा लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर तेथील आरोपीच्या घरातून 60 किलो गांजा, 290 ग्रॅम चरस आणि 19 बाटल्या चरस ऑइल (हॅश) असा अमली पदार्थ साठा जप्त केला होता.

दरम्यान, पुढील तपासात आरोपी रिषभ यास ड्रग्ज पुरवणार्‍या आणखी काही जणांची नावे समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकाने अभिजित अविनाश भोईर (29, खर्डी, जिल्हा ठाणे), पराग रेवंडकर (31, डोंबिवली) या दोघांना 20 फेब्रुवारी रोजी अटक केली. या दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे चरस व गांजा अमली पदार्थ जप्त केले. तर मामा उर्फ सुरेंद्र अहिरे (54) आणि राजू जाधव (40) या दोघांना 23 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून 1 किलो 507 ग्रॅम हॅश हे ड्रग्ज जप्त केले.

अटक केलेला आरोपी रिषभ शहापूर येथील राहणारा

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची एकूण किंमत 1 कोटी 83 लाख 34 हजार 980 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेला आरोपी रिषभ हा मूळ शहापूर येथील राहणारा आहे. तो सध्या बदलापुरात राहतो व तेथून ऑनलाईन ड्रग्ज विक्री करतो. आरोपी इंस्टाग्राम अ‍ॅप वरून चरस,हॅश व गांजा अशा अमली पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करीत होता असे पोलीस तपासातून समोर आले आहे. ड्रग्ज तस्करांच्या या टोळीने अमली पदार्थ कोणाकडून आणले होते व त्यांनी ड्रग्ज विक्रीचे जाळे नेमके कसे पसरले होते याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news