ठाणे: भिवंडीत ७ पिस्तुल, १० जिवंत काडतुसे जप्त; एक अटकेत | पुढारी

ठाणे: भिवंडीत ७ पिस्तुल, १० जिवंत काडतुसे जप्त; एक अटकेत

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या शस्त्र तस्करास ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या. या तस्कराच्या ताब्यातून पोलीस पथकाने 7 देशी बनावटीचे पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत. गुरुचरण छाबिलासिंग जुनेजा (वय 23, मु. पो. पाचोरी, ता. खकणार, जिल्हा बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकास एक जण नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकोली नाका येथे पिस्तुल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 23 फेब्रुवारीरोजी या ठिकाणी सापळा रचुन पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या गुरुचरण छाबिलासिंग जुनेजा यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात 7 देशी बनावटीची माऊजर पिस्तुल व 10 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पिस्तुल जप्त करीत शस्त्र तस्करास अटक केली. आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि त्याची विक्री करणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button