Thane : मतदार यादीतून वगळले १ लाख २८ हजार ४४७ नावे | पुढारी

Thane : मतदार यादीतून वगळले १ लाख २८ हजार ४४७ नावे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहिम राबविल्यानंतर १ लाख ७७ हजार ७८ नवीन मतदारांची  नोंदणी झाली. तर तब्बल १ लाख २८ हजार ४४७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. लक्षणीय वाढलेल्या नवमतदारांसह ४८ हजार ६३१ मतदारांची निव्वळ वाढ झाल्याने जिल्ह्यातील मतदारांची संख्या ६३ लाख ९२ हजार ५२० इतकी झाल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषेदेत दिली. (Thane)

Thane : ४३ हजार ८८९ मतदारांची वाढ

सुमारे १ कोटी १० लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्यात १६ हजार ७८५ पुरुष मतदारांची, ३१,७१५ स्त्री मतदारांची आणि १३१ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ८४८ वरुन ८५३ इतके झाले आहे.

१८ ते १९ वयोगटामध्ये ३९ हजार ५९० मतदारांची नव्याने भर पडून ती संख्या ६९,७२० झाली आहे. २० ते २९ या वयोगटात ४३ हजार ८८९ मतदारांची वाढ झाल्याने मतदार संख्या १० लाख २३ हजार ४२ (१६.०० टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबविलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

 जिल्ह्यातील ४७ हजार ७०९ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यापैकी ८० पेक्षा अधिक वय असलेले १८,८१३ मतदार मृत अथवा नावात सुधारणा झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये १ लाख ५० हजार ८१३ छायाचित्र समान नोंदी असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करुन ४८ हजार ३५४ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशिल समान असलेले लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदी २७ हजार ०९३ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करुन ९,०१९ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत.

मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभाग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरिक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणी बरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले आहे. ठाणे जिल्हयातील उपविभागीय उल्हासनगर विभाग उल्हासनगर यांच्या कार्यक्षेत्रात ही शिबिरे घेण्यात आली होती, त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण ३८४ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात कातकरी (काथोडी) हे विशेष असुरक्षित आदिवासी समूह आहेत. यंदाच्या अंतिम मतदार यादीत या समूहातील २७,४६३ मतदारांचा समावेश आहे.

दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शहरी मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील शहरी विधानसभा मतदार संघातील ३४ मतदान केंद्रे ही मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे शहरी विधानसभा मतदार संघातील मतदानाचा टक्का काही प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा आहे.

.२३ जानेवारीरोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

मतदारांनी भारत निवडणूक आयोगाकडील “मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुध्दा तपासून घ्यावे, जेणेकरुन ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना ६ क्रमांकाचा अर्ज भरुन आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शिनगारे यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीं  यांच्या नियुक्त्या करुन त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल, तसेच “मतदाता सेवा पोर्टल” आणि “वोटर हेल्पलाईन” अॅप यावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे.

हेही वाचा 

Back to top button