ठाणे : रेव्ह पार्टी प्रकरणी आणखी ३ जणांना अटक | पुढारी

ठाणे : रेव्ह पार्टी प्रकरणी आणखी ३ जणांना अटक

ठाणे : पुढारी वृत्‍तसेवा ठाण्यात नववर्षाच्या रात्री पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकून 95 जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, ज्या जागेवर रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्याच ठिकाणी यापूर्वी देखील अनेकवेळा रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथील खाडी किनारी निर्जनस्थळी होत असलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून 90 तरुण तर 5 तरुणींना झिंगाट अवस्थेत ताब्यात घेतले होते. या रेव्ह पार्टीचे आयोजन करणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून आठ लाख रुपये किमतीचा चरस, एलएसडी, एस्कैंटसी पिल्स, गांजा हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले होते.

या प्रकरणी पुढील तपास करीत असलेल्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पार्टी आयोजन करणाऱ्या आणखी तिघांना अटक केली आहे. अटकेतल्या आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यापूर्वी देखील त्याच ठिकाणी त्याच जागेवर दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इतकच नव्हे तर यापूर्वी देखील अशा बऱ्याचदा रेव्ह पार्टी त्याच ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. ही रेव्ह पार्टी आयोजित करणारे व त्या रेव पार्टीमध्ये अमली पदार्थ पुरवणारे सर्वजण 20 ते 25 वयोगटातील तरुण मंडळी आहेत. यामधील आता आणखीन तिघांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. कृष्णदेव मिश्रा, आर्यन शेलार, प्रथमेश इंगळे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. कृष्णदेव याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चाळीस एलएसडी डॉट पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच आर्यन शेलार याला कळव्यातून व प्रथमेश इंगळे याला ठाण्यातील कोपरी परिसरातून अटक करण्यात आली आहे.

जागा मालकाचा शोध

ज्या ठिकाणी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या मूळ जागेच्या मालकाला पोलिसांनी शोधून काढले आहे. हा जागा मालक ठाणे महानगरपालिकेचा सफाई कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जागा मालकावर देखील पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button