

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदार संघात खेड तालुक्यात आज शनिवारी भव्य शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करून शिवसेनेच्या वतीने शिरूर लोकसभेवर आपलाच दावा असल्याचे स्पष्ट केले. यामुळे महायुती मध्ये हा मतदार संघ नक्की कुणाला मिळणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. यात बारामतीसह शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस चा उमेदवार असेल पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
संबंधित बातम्या :
परंतु पक्षाचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट नाही. भाजप -शिवसेना युतीमध्ये शिरूर लोकसभा मतदार संघ नेहमीच शिवसेनेच्या वाट्याला आला. गेले वीस वर्षे या मतदार संघातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. परंतु अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आढळराव पाटील यांचे काय होणार, शिवसेनेच्या चिन्हावर लढणार की महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या चिन्हावर लढणार याबाबत मतदार संघात जोरदार चर्चा सुरू झाली. परंतु मी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढता शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात भव्य शिवसंकल्प मेळावा आयोजित केला. मराठा आंदोलनाचे प्रमुख जरांगे पाटील यांची सभा झालेल्या जागेवरच हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सर्वत्र शिवसेनेचे भगवे झेंडे लावून खेड तालुका आणि परिसरात भगव्येमय वातावरण तयार केले. शिरूर लोकसभा मतदार संघातील गावा-गावातील महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.