

टिटवाळा : मतदार याद्यांतील गोंधळाचा भस्मासूर दिवसेंदिवस असा वाढत चालला आहे की, ठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचे नाव गायब झाल्याचा धुरळा अद्याप खाली बसलेला नसतानाच, कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्या मतदार यादीतून माजी उपमहापौर बुधराम सरनोबत यांचेच नाव गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
टिटवाळा प्रभागात स्वतः प्रबळ दावेदार, दोन टर्म नगरसेवकाचा असताना, उपमहापौर राहिलेले असताना त्यांचेच नाव मतदार यादीतून वगळले गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक कामकाजातील नेमकेपणा राखण्याची जबाबदारी असलेल्या विभागाकडून अशा ‘मोठ्या’ नावांची गाळत पुन्हा एकदा झाल्याने टीकेची झोड उठली आहे. सामान्य नागरिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी कोणालाही सोडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मतदारांचे प्रशासनावरचे विश्वासाचे धागेच सुटत चाललेत, अशी टीका होत आहे. सरनोबत समर्थकांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी करण्याची तयारी सुरू केली आहे. मतदार याद्यांच्या गोंधळामुळे आता राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.