कल्याणामधून निघाली श्री. दुर्गामाता महादौड मिरवणूक; शस्त्र, रथ, घोडे, बैलगाड्यांचा सहभाग | पुढारी

कल्याणामधून निघाली श्री. दुर्गामाता महादौड मिरवणूक; शस्त्र, रथ, घोडे, बैलगाड्यांचा सहभाग

सापाड; पुढारी वृत्तसेवा : ‘श्री जय राम जय राम जय जय राम’ च्या गगनभेदी घोषणांनी कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिरापासून सुरुवात करण्यात आलेली दुर्गामाता महादौड मिरवणुकीची सांगता सोहळा पार पडला. हा सोहळा दुर्गाडी मंदिरात दुर्गा देवीच्या आरतीने संपन्न झाला. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेपासून सुरुवात करण्यात आलेली ‘श्री दुर्गामाता दौड’ मिरवणूक कल्याण-डोंबिवलीतील तरुणाईचे आकर्षक ठरले होते. कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिरात आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते श्री. दुर्गामाता दौडचे पूजन करून दुर्गामाता दौड कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी मंदिराकडे रवाना करण्यात आली.

संबंधित बातम्या 

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी पोहोचावा यासाठी १९९० साली भिडे गुरुजींच्या अध्यक्षतेखाली ‘श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची’ स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या बत्तीस वर्षांपासून कल्याणातून ‘श्री दुर्गा माता दौडचे’ आयोजन नवरात्र उत्सवातील विजयादशमीच्या दिवशी करण्यात येते. नवरात्र उत्सवातील नऊ दिवस कल्याणातील एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात ही दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. तर विजयादशमीच्या मुहूर्तावर महादौड सांगता करण्यात येत असते. ही महादौड “श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या” माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत असते.

या दौडमध्ये सहभागी धारकरी पारंपरिक वेशभूषा धारण करून, हातात शस्त्र मिरवीत घोडे, रथ, बैलगाडीच्या माध्यमातून शाही मिरवणुकीत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, बाळ शिवाजी, बाळ संभाजी आणि जिजा मातेची हुबेहूब वेशभूषा करणारे कलाकार प्रेक्षकांचे अर्कक्षण ठरले होते. नऊ दिवस सुरू असणाऱ्या या “श्री दुर्गा माता महादौड” मिरवणुकीची सांगता दुर्गाडी येथील दुर्गा देवी मंदिरात दुर्गा देवीच्या आरतीने करण्यात आली. दसऱ्याला शस्त्रांची पूजन करण्याच्या प्रथेप्रमाणे दुर्गा देवीच्या पायाशी शस्त्रांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, संजय मोरे, गणेश काळे, विकी काळे, अतुल भांडवळकर, शुभम गोळेकर, गौरव बेलगावकर, प्रथमेश सुभेदार यांच्यासह कल्याण विभागाची शेकडों धारकरी उपस्थित होते.

नवरात्रीमधील घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रत्येक वर्षी सुरुवात करण्यात आलेली “श्री दुर्गा माता महादौड” आजच्या दहाव्या दिवशी विजया दशमीच्या मुहूर्तावर दुर्गाडी मंदिरात देवीच्या आरतीने सांगता करण्यात आली. प्रत्येक दिवशी कल्याणातील एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात ही दुर्गामाता दौडचे आयोजन होत असते. तर आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या महादौडची सांगता दुर्गामाता मंदिरात करण्यात आली. या महादौडमध्ये प्रत्येकवर्षी तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-प्रथमेश सुभेदार

Back to top button