नीरा-लोणंद मार्गावरून ताशी 117 किमी वेगाने ट्रायल | पुढारी

नीरा-लोणंद मार्गावरून ताशी 117 किमी वेगाने ट्रायल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मीरज दुहेरीकरणातील महत्वाचा टप्पा असलेल्या नीरा-लोणंद मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम नुकतेच पुर्ण झाले असून, प्रशासनाने रविवारी रात्री ताशी 117 किलोमीटर वेगाने ट्रायल रन घेऊन यशस्वी केली. त्यानंतर हा मार्ग प्रवासी वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

नव्याने बांधलेल्या नीरा ते लोणंद दुहेरी रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, या नवीन रेल्वेमार्गावरून गाड्यांची वाहतूक रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून सुरू केली आहे. याचा प्रवाशांना फायदा होणार असून, गाड्यांच्या वेगवान प्रवासासह उत्पन्न वाढीला देखील मोठा हातभार लागणार आहे. पुणे-मिरज रेल्वे मार्गावर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.

त्यातील कामे टप्प्याटप्प्याने सुरू असून, या प्रकल्पात नीरा ते लोणंद स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी रविवारी 07.64 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची सखोल पाहणी केली. त्यानंतर या सेक्शनमध्ये गाड्या चालविण्यास त्यांनी परवानगी दिली. यावेळी त्यांच्यासोबत निर्माण (कन्स्ट्रक्शन) विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

असे सुरू आहे पुणे-मिरज दुहेरीकरण…

पुणे – मिरज या 279.05 किमीच्या रेल्वे मार्गावर आतापर्यंत 174.68 किमी दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, यात पुणे ते शिंदवणे, आंबळे ते राजेवाडी, दौंडज ते वाल्हा, शेणोली ते भवानी नगर, भवानी नगर ते ताकारी, ताकारी ते किर्लोस्करवाडी, सातारा ते कोरेगाव, पळशी ते जरंडेश्वर,नांद्रे ते भिलवडी, नांद्रे ते सांगली इत्यादी विभागाचा समावेश आहे. उर्वरित विभागामध्ये देखील रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. नीरा-लोणंद विभागामध्ये ट्रॅक दुहेरीकरणासोबतच विद्युतीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

हेही वाचा

Nashik News : द्राक्षबागांवर डावण्या रोगाचा प्रादुर्भाव

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

सप्तशृंगी गडाच्या शिखरावर फडकला कीर्तिध्वज, 500 वर्षांची परंपरा

Back to top button