ठाणे : टोलदरवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट : राज ठाकरे | पुढारी

ठाणे : टोलदरवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट : राज ठाकरे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा टोल बंद करण्यासाठी मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलने केली. या आंदोलनाव्दारे अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास 65 ते 67 टोल नाके आंदोलने करून बंद केले. मात्र शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, त्यानंतर टोलसंदर्भात भूमिका जाहीर करणार आल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

टोलदरवाढी विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या चार दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन अविनाश जाधव आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

ठाण्यात जे उपोषण सुरू आहे त्याबाबत आपण माहिती घेतली. त्यानंतर मी काल अविनाश जाधव यांना फोन केला आणि हे उपोषण आपले काम नाही असे सांगितल्‍याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही 65 ते 67 टोल नाके आंदोलने करून बंद केलीत. शिवसेना भाजपच्या जाहीर नाम्यात टोल नाके बंद करू असे आश्वासन दिले होते. 2014 आणि 2017 ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते. पण आम्हाला टोल नाक्याचे काय झाले हे विचारले जाते मात्र टोलमुक्तीची घोषणा करणाऱ्यांना कोणी प्रश्न विचारत नाही.
काल मोपलवारांशी बोलणे झाले, 2002 ला ऍग्रिमेंट झाले त्यावर पैसे उचलले असे त्यांनी सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. जो पेडर रोड झाला नाही त्याचेही पैसे घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला. म्हैसकर हे कोणाचे लाडके आहेत. एकनाथ शिंदे यांनी टोल संदर्भात याचिका का मागे घेतली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जे पिळवणूक करतात लोकं त्यानाच मतदान करतात असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपोषण मागे घ्यायला लावले

येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेण्यास सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच आता पुढची दिशा ठरणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button