

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे घोटाळेबाज लुटमार करणारे आहे, असा आरोप करत येत्या काही दिवसांत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेनंतर ज्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, अशा नऊ मंत्र्यांची हकालपट्टी होणार असल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्या मंत्र्यांची नावे आताच सांगू शकत नाही; पण सरकारने या भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी केली नाही, तर आम्ही त्यांचे घोटाळे जनतेसमोर मांडणार, असा इशाराही त्यांनी दिला.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवतानाच नऊ मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, मुश्रीफ यांच्याबाबत पीएमएलए कोर्टाचे गंभीर स्वरूपाचे निरीक्षण आहे. या निरीक्षणातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, १६ अपात्र
आमदारांवर कारवाई होणारच आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
ज्या मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत, भ्रष्ट आहेत किंवा न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे, अशा नऊ मंत्र्यांना काढण्याची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यांना शुद्ध करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी त्यातून त्यांना स्वच्छ होऊन बाहेर पडता आले नाही. कारण 'दाग बहुत जिद्दी है, निकलते ही नही…' अशी परिस्थिती या नऊ मंत्र्यांची झाली आहे. म्हणून त्यांना काढल्याशिवाय पर्याय नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. कारण या तक्रारी आम्ही केलेल्या नाहीत; तर भाजपच्याच नेत्यांनी या नऊ मंत्र्यांविरोधात तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे ईडीने नोटिसा दिल्या असतील, त्यांची चौकशी सुरू झाली असेल. काही जणांच्या बाबतीत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असेल, अशी सर्व प्रकरणे आहेत. त्यातून सरकारला वाचण्याची संधी नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार नेहमीच नाराज असतात अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर बोलताना वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. अजित पवार तर नेहमीच नाराज असतात. त्यांच्या पद्धतीने काही काम झाले नाही तर ते अशी नाराजी व्यक्त करतात. त्यांची ती पद्धत आहे. नेहमी नाराज राहायचे आणि आपले वर्चस्व तयार करायचे, हे त्यांचे नेहमीचेच आहे, असा टोला त्यांनी लगावला