मुंबईत लोकसभेच्या दोनच जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता

मुंबईत लोकसभेच्या दोनच जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता

मुंबई :  मुंबई शहर व उपनगरातील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार मतदार संघांसाठी भाजपाचे नेते आग्रही आहेत. त्यानुसार त्यांची या मतदारसंघांत बांधणीही सुरू झाली आहे. यात सध्या शिवसेनेकडे असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण-मध्य मुंबई व उत्तर-पश्चिम मुंबई या दोनच मतदारसंघांवर समाधान मानावे लागणार आहे.

लोकसभा निवडणूक जानेवारी २०२४ मध्ये होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मुंबई शहर व उपनगरात दक्षिण मुंबईसह दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व ईशान्य मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती.

सहापैकी पाच मतदारसंघांत काँग्रेसचे मिलिंद देवरा, प्रिया दत्त, गुरुदास कामत, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड, तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील हे निवडून आले. २०१४ मध्ये मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सध्याचा ठाकरे गट व भाजपमध्ये युती होती. त्यामुळे या सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघांत
भाजपचे गोपाळ शेट्टी, पूनम महाजन व किरीट सोमय्या, तर तीन मतदारसंघांत शिवसेनेचे अरविंद सावंत, राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर निवडून आले. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गट व भाजपमध्ये युती होती. यावेळीही युतीच्या सहाही जागा निवडून आल्या होत्या.

आता या मतदारसंघांतील परिस्थिती वेगळी असून भाजपसोबत शिंदेंची शिवसेना आहे. ठाकरे गटाबरोबर युती असताना मुंबईत लोकसभेच्या समसमान जागा वाटण्याचा फॉर्म्युला होता. तो आता भाजपने पूर्णपणे बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाला दक्षिण मध्य मुंबई व उत्तर पश्चिम मुंबई हे दोन मतदारसंघ देऊन, विद्यमान खासदार राहुल शेवाळे व गजानन कीर्तिकर यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, तर सध्या शिवसेनेकडे असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. या मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. दक्षिण मुंबईसह भाजपने उत्तर मुंबई, उत्तर-मध्य मुंबई व ईशान्य मुंबई स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात अनुक्रमे भाजपचे गोपाळ शेट्टी, पूनम महाजन व मनोज कोटक हे खासदार आहेत.

दरम्यान, भाजपची ही मागणी शिंदे गटालाही मान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबईत शिंदे गटाकडे तगड़ा उमेदवार नसल्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या मतदारसंघातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news