Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचा ‘होऊ द्या चर्चा’ अनोखा प्रयोग; चौक सभांचे आयोजन | पुढारी

Kalyan-Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचा 'होऊ द्या चर्चा' अनोखा प्रयोग; चौक सभांचे आयोजन

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य सरकारकडून लादण्यात आलेल्या योजनांविषयी माहिती कल्याण-डोंबिवलीकरांना कळावी, या योजना कशा फसव्या ठरल्या आहेत याचा पर्दाफाश करण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटातर्फे अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचीन बासरे, तर डोंबिवलीत शहरप्रमुख विवेक खामकर यांच्या नेतृत्वाखाली ‘होऊ द्या चर्चा’, हा विषय घेऊन नाक्या-नाक्यांवर चौक सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांशी थेट संवाद साधण्यासाठी शहराच्या विविध भागांतील चौकांत ठाकरे गटातर्फे ‘होऊ द्या चर्चा’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या फसव्या योजनांविषयी या चौक सभांच्या माध्यमातून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कल्याण-डोंबिवलीकरांशी संवाद साधणार आहेत. 1 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत सभा होणार आहेत. कल्याणचे शहरप्रमुख सचिन बासरे, तर डोंबिवलीत शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यावर या सभांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत केंद्रातील भाजप सरकारसह राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने अनेक घोषणा केल्या. जनतेला आश्वासने दिली आहेत. तथापी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या योजनांच्या माध्यमातून जनतेची कशी फसवणूक केली जात आहे, याची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे विवेक खामकर यांनी सांगितले.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी, दुर्बल घटक, विकासाचे प्रकल्प याविषयी केंद्रातील भाजपा सरकारने वेळोवेळी अनेक आश्वासने जनतेला दिली. राज्य सरकारने अशाच घोषणा केल्या. प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने जनतेची दिशाभूल केली जात आहे. काही योजना सुरू असल्या तरी त्यांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थीपेक्षा अन्य मंडळी घेत आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या भावनेशी कसे खेळत आहेत, हे या उपक्रमाच्या माध्यमातून उलगडून सांगितले जाणार आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कल्याणचे शहरप्रमुख सचिन बासरे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले. कल्याणमध्ये अशाच प्रकारे चौक सभा आणि मार्गदर्शन कार्यक्रम मराठा समाज मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button