Thane Crime News: कल्याणमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरूणीवर चाकू हल्ला | पुढारी

Thane Crime News: कल्याणमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरूणीवर चाकू हल्ला

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी एकीकडे पोलिसांनी डोळ्यात तेल घालून सर्वत्र जागता पहारा ठेवला होता. मात्र, दुसरीकडे एवढे करूनही कल्याणमध्ये गणेशोत्सवाला हिंसाचाराचे गालबोट लागले. पूर्वेकडील कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या नांदिवली गावातील तलावावर आपल्या नातेवाईकांसह गणपती विसर्जनासाठी आलेल्या एका 20 वर्षाच्या तरूणीला सात-आठ तरूणांच्या टोळक्याने बेफाम मारझोड केली. यावेळी तरूणीला वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या तिच्या नातेवाईकालाही मारहाण झाली. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. (Thane Crime News)

अंजली हरीश ठाकूर (वय 20) असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी मलंगगड रोडला असलेल्या आडिवली भागात राहते. सोमवारी अंजली आपल्या नातेवाईकांसह नांदिवली तर्फे असलेल्या गावातील तलावावर गणपती विसर्जनासाठी गेली होती. त्यावेळी रात्रीचे साडे अकरा वाजले होते. विसर्जन करुन घरी पायी येत असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सैफ अली खान, राम तिवारी, स्काय गुलाम, सत्यम, भावेश, विशाल आणि त्यांच्या साथीदारांनी अंजलीला रस्त्यात अडवले. सुरुवातीला शिवीगाळ करत दमदाटी केली. (Thane Crime News)  त्यानंतर बेदम मारहाण करत तिला रस्त्यावर पाडले. अंजलीचे मामा तिच्या बचावासाठी पुढे आले असता बदमाश टोळक्याने त्यांनाही झोडपून काढले. विशेष म्हणजे या टोळक्यातील एकाने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून अंजलीला दुखापत केली.

Thane Crime News : हल्ल्याचे कारण अस्पष्ट

विसर्जन स्थळादरम्यान झालेल्या या राड्यानंतर सात-आठ बदमाशांच्या टोळक्याने तेथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत अंजलीने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तरुणीवर झालेल्या हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भारत ढेंबरे आणि त्यांचे सहकारी फरार टोळक्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा 

Back to top button