ठाणे : बाळकूम दुर्घटनेतील ‘ती’ लिफ्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त; ठेकेदारांवर गुन्हा दाखल

ठाणे : बाळकूम दुर्घटनेतील ‘ती’ लिफ्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त; ठेकेदारांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : बाळकूम दुर्घटनेतील तीन लिफ्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त होती तसेच दुर्घटनेच्या दिवशीही लिफ्टमधून वारंवार आवाज येत होता अशी धक्कादायक माहिती या दुर्घटनेतील तक्रारदार मजुराने दिली आहे. या मजुराने दिलेल्या तक्रारीनुसार लिफ्टच्या तसेच मजूर पुरवणाऱ्या ठेकेदारावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे लिफ्ट दुरुस्त करण्यासंदर्भात मजुरांकडून सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे या तक्रारदार मजुराचे म्हणणे आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृत कामगारांची संख्या आता सात झाली आहे. उपचारादरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल कॉम्प्लेक्समधील आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून लिफ्टने सहा कामगारांसह एक लिफ्ट ऑपरेटर खाली येत होते. यावेळी लिफ्ट खालील भाग पूर्णपणे निखळला. त्यातून सर्व कामगार खाली कोसळून त्यांच्यावर लिफ्टचा लोखंडी सांगाडा कोसळला. या दुर्घटनेत जागीच पाच आणि उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव व सहायक पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मजुरांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणी दशरथकुमार दास या मजुराने दिलेल्या तक्रारीनुसार लिफ्ट, मजूर ठेकेदार आणि इतरांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त लिफ्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त असूनही तिचा वापर सुरु असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दुरुस्ती करून ही लिफ्ट बांधकाम साहित्य, मजुरांची ने – आण करण्यासाठी वापरात आणली जात होती. दुर्घटनेच्या दिवशीही लिफ्ट मोठ्याने आवाज करत थांबून चालत होती. त्यानंतरच हा अपघात घडल्याचे तक्रारदार मजूर दास याने पोलिसांना सांगितले. ही लिफ्ट सागर एलिव्हेटर कंपनीची असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

विकासकांकडून मजुरांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत…

या घटनेत मृत झालेल्या ७ मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत विकासकांकडून जाहीर करण्यात आली आहे.जवळपास सर्वच मजदूर हे बिहारचे असल्याने त्यांच्या नातेवाईकांचा शोध विकासांकडून सुरु करण्यात आला आहे. तर वापरण्यात येणारी लिफ्ट सुस्थितीत असल्याचा दावाही विकासकांकडून करण्यात आला आहे.

विकासकाची महापालिकेत धाव..

ही दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीचे विकासक संदीप रुणवाल यांनी दुसऱ्या दिवशीच सकाळी ठाणे महापालिकेत धाव घेतली आहे. यामध्ये त्यांनी शहर विकास विभागात जाऊन पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी पालिका आयुक्तांचीही भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण आयुक्तांची भेट घेतली नसल्याचा दावा विकासक रुणवाल यांच्याकडून करण्यात आला आहे.

सुरक्षा प्रमाणपत्र असूनही लिफ्ट कशी कोसळली?

१९ ऑगस्ट रोजी लिफ्ट सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र हे सुरक्षाप्रमाण पत्र देऊनही ही लिफ्ट कशी कोसळली याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक महिन्याला लिफ्टची तपासणी केली जात असून शेवटचे प्रमाणात देऊन एक महिनाही उलटलेला नाही. दुसरीकडे मजुरांच्या म्हणल्याप्रमाणे लिफ्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त होती. त्यामुळे या घटनेला नेमके जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

आमच्याकडे प्रत्येक महिन्याला लिफ्ट सुस्थितीत आहे का नाही यासंदर्भात तपासणी करून सुरक्षेचे प्रमाणपत्र घेतले जाते.लिफ्ट वाहून नेण्याची क्षमताही ७ माणसांची होती. शेवटचे प्रमाणात पत्र १९ ऑगस्टलाच घेण्यात आले होते. याच लिफ्टचा वापर आम्हीही करत होतो. ही दुर्घटना कशी घडली याबाबत आम्हीही अनभिज्ञ आहोत. मात्र घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून मजुरांना सर्वोतोपरी मदत केली जाईल.
संदीप रुणवाल, विकासक

बाळकूमच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्या प्रत्येकावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तसेच लिफ्टला सुरक्षा प्रमाणपत्र देणाऱ्या कंपनीवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे.
– संजय भोईर, स्थानिक माजी नगरसेव

ठाण्यात नगररचना विभागाचा आधीच भोंगळ कारभार असून अनधिकृत बांधकामे जोमात सुरू आहेत. त्यातच लिफ्ट दुर्घटनेत सात कामगारांच्या दुर्देवी मृत्यूप्रकरणी विकासक आणि पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा.
– केदार दिघे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.लिफ्टला सपोर्ट करणारा रोप तुटल्याने ही घटना घडली आहे. तपासानंतर सर्व समोर येईल. मात्र प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले असून रविवारी रात्रीच विकासकावर गुम्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.विकास परवानगी देत असताना अटी शर्तींवर परवानगी दिली जाते.यामध्ये कामगारांची सुरक्षा, इमारतीपर्यंत रस्ता आहे का? अशी तपासणी महापालिकेकडून केली जाते.
-अभिजित बांगर, आयुक्त, ठा.म.पा

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news