ठाणे; पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे शिवाजी पाटील यांच्यातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी श्री गजानन गोविंदा पथकाने मंत्री पाटील यांच्या समोर नऊ थर रचून सलामी दिली. तर आमदार निरंजन डावखरे यांनी गोविंदा पथकांसाठी 25 लाखांचे पारितोषिक जाहीर केले.
गोविंदांचा उत्साह पाहिल्यानंतर आपणही व्यासपीठावरून उतरून नऊ थर लावावेत अशी इच्छा होत असल्याचे मंत्री पाटील यावेळी म्हणाले. ठाण्यातील गोविंदांचा उत्साह चंदगड पर्यंत पोहोचलेला आहे. पालघरचे गोविंदा आज दहीहंडीसाठी ठाण्यापर्यंत येऊ लागले आहेत. त्यामुळे पुणे तिथे काय उणे ही उक्ती आता ठाण्यासाठी लागू होत असून ठाणे तिथे काय उणे असे आता म्हंटले जात असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.
2019 च्या चंदगड विधानसभेत शिवाजी पाटील यांना विजयाची हंडी फोडता आली नाही. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत पाटील ही हंडी नक्की फोडतील. असा विश्वास मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.