ठाणे : उड्डाणपुलाअभावी कल्याण – शिळ रोडवर वाहतूककोंडी | पुढारी

ठाणे : उड्डाणपुलाअभावी कल्याण - शिळ रोडवर वाहतूककोंडी

योगेश गोडे

सापाड : कल्याण-शिळ रस्त्यावरील पालावा चौकातील उड्डाणपुलाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. चार वर्षे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. उड्डाणपुलाअभावी पालावा चौकात तासंतास वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही वाहतूककोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे काम जलद गतीने करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केली आहे.

संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम तात्काळ मार्गी नाही लावले तर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पाटील यांनी पत्राव्दारे दिला आहे. पाटील यांनी दिलेल्या पत्रानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले असून उड्डाणपुलाच्या कामासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

मुंबई-ठाणे-पनवेल-वाशी-कल्याणसह डोंबिवली, कर्जत, कसारा वासियांनी कल्याण-शिळ परिसराला चांगलीच पसंती दिली आहे.  मुंबईच्या जवळ परवडणाऱ्या घरांची मागणी वाढू लागल्याने कल्याण-शिळ रस्त्यावर नवनवीन संकुलांची उभारणी होऊ लागली आहे. नोकरी- शिक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्यांना हे ठिकाण सोयीचे ठरत असल्याने या ठिकाणी रहदारी वाढली आहे. परिसरातील वाढती रहदारी लक्षात घेता चार मार्गिका देखील कमी पडू लागल्यामुळे सहा मार्गिकेला प्रस्ताव मंजूर करून भूसंपादन करून सहा मार्गिका तयार करण्यात आल्या. तरीही कल्याण-शिळ मार्गातील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे २०१८ साली पालावा चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. चार वर्षे झाली तरी या पुलाचे काम संथगतीने सुरू असून प्रशासनाला या पुलाच्या कामाबद्दल गांभीर्य का नाही? असा सवालही संदीप पाटील यांनी पत्राव्दारे केला आहे. उड्डाणपुलाचे काम जलद गतीने सुरू झाले नाही, तर संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button