कोल्हापूर : सरूड येथील दिव्यांग विनायकची मनाला चटका लावणारी एक्झिट!

कोल्हापूर : सरूड येथील दिव्यांग विनायकची मनाला चटका लावणारी एक्झिट!
Published on
Updated on


सरूड : खेळखोर वयातच त्याचे शरीर लुळे, बधिर होत गेले. अशातही खंबीर मन आणि कुटुंबीयांचा लळा हीच त्याची आशा उरली होती. हीच आशा पुढे जाऊन त्याचे बलस्थान बनली. अंथरुणाशी खिळलेला हा जीव परावलंबित्व विसरून भक्तीरसात तल्लीन झाला. शाळा बंद झाली, तरी टीव्ही, मोबाईल या भौतिक आणि ऐहिक सुखाचा ठपका असलेल्या साधनांचा सकारात्मक वापर कसा करावा, याचा जणू त्याने वस्तुपाठच घालून दिला. हा असाधारण जीव काळचक्रापुढे हरला अखेर शुक्रवारी (ता. ४) वाढदिवसादिवशी सकाळी हे जग सोडून परलोकी निघून गेला. सरूड (ता. शाहूवाडी) येथील विनायक अनिल वडर (वय २१) या सालस मुलाची ही करुण कहाणी सर्वांनाच चटका लावणारी ठरली.

विनायकला जडला दुर्मिळात दुर्मिळ आजार

विनायक हा जन्मताच तसा अशक्त.. तो तिसऱ्या इयत्तेपर्यंत लंगडत, ठेचकळत शाळेला जायचा. चौथीत जाताजाता विनू व्हीलचेअरवर आला, तसे सगळ्या कुटुंबाच्या काळजात धस्स् झाले. चंदेरी दुनियेशी निगडित पण त्याआधी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत किरण पोटे या मित्राच्या सहकार्याने कोल्हापुरात विनूच्या बोन मॅरो, डीएमडी या वैद्यकीय चाचण्या केल्यावर त्‍याला दुर्मिळात दुर्मिळ आजार जडल्याचे निदान समोर आले. ज्यावर जगाच्या पाठीवर कसलाही उपचार उपलब्ध नाही.

शाळा झाली कायमची बंद…

आता विनू चौथी पास झाला होता. पण शरीराच्‍या मर्यादेमुळे त्‍याची शाळा कायमची बंद झाली. मानेवरचा डोक्याचा भाग व हातांचे पंजे हेच काय ते हालचाल करणारे अवयव. याही कठीण परिस्थितीत आई-वडील, आजी-आजोबांनी विनूला स्वीकारलेच नव्हे, तर तळहातावर घेतले. त्‍याची सर्व सेवासुश्रुषा घरच्यांसाठी नित्यक्रम बनला. भिंतीला टेकवूनच त्याची बैठक. वडील कामासाठी घराबाहेर गेल्यावर बोजड शरीर वाहने आई, आजी, आजोबांना 'जड' जातंय हे ओळखून या समजूतदार जीवाने भुकेपेक्षा खाणपानही कमीच ठेवले.

लागला भक्‍तीचा लळा

दिवसभर एका जागेवर बसून टीव्ही बघून कंटाळलो तरीही तक्रार नाही. मग वडिलांनी आणून हातात टेकविलेला मोबाईल फोन विनूच्या अचल मेंदूसाठी वरदानच ठरला. यातून भक्तीचा लळा लागला. मोबाईल हातांच्या पंजांनी अक्षरशः चाळू लागला. मोबाईलचे अंतर्गत ज्ञान चौथी पास विनूच्या अंगी भिनू लागले. याचा सकारात्मक उपयोग करीत हिंदी, मराठी भाषेतील अध्यात्मिक मालिका डोळ्याखालून घातल्या. त्याचवेळी (कौन बनेगा करोडपती सारख्या मालिका) निर्मात्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरेही त्या त्या साईट्सवर पाठवत राहिला. लिटरेचर  ॲप डाऊनलोड करुन अनेक आध्यात्मिक पुस्तके वाचून हातावेगळी केली. यात भगवद्गीता सलग ७ वेळा वाचून काढली. किर्तनकाराला लाजवेल अशा अनेक ओव्या, अभंग, अध्याय, हरिपाठ तोंडपाठ झाले होते. रोज सकाळ-संध्याकाळी हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र व गायत्री मंत्र पठण हाच  विनूचा ध्‍यास बनला.

व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर स्वतःचे प्रोफाईल हाताळताना काही महिन्यांपूर्वी एका अमेरिकन नेटवर्क कंपनीसोबत तो जोडला गेला. येथे संपूर्ण इंग्लिशमध्ये चॅटिंग करुन अचंबित करून सोडणारा विनू या नेटवर्क कंपनीचा सदस्य बनला होता.

संकष्‍टी दिवशीच घेतला अखेरचा श्‍वास

संकष्टी चतुर्थीला जन्मलेल्या विनूचा शुक्रवारी (ता.४) वाढदिवस होता. आदल्या रात्री अनेकांना फोनवरून तसे संदेश दिले. आई-वडील आणि आजीला देखील विनूचा वाढदिवस माेठ्या उत्‍साहात  कुतूहल वाटत होते. सकाळी उठून आंघोळपाणी आवरून दिवसाची आनंदाने सुरुवात झाली होती; पण काळाच्या पोटात भलतेच दडले होते. वाढदिवस साजरा करण्याच्या कल्पनाविश्वात दंग असणाऱ्या वडर कुटुंबाला काळाच्या पावलांची पुसटशी कल्पना नव्हती. काही उमगायच्या आत विनूने संकष्टी दिवशीच आपला देह ठेवला. अंथरुणाला खिळूनही विनूचा सावळ्या रंगातील हसरा चेहरा आणि ते लुकलुकणारे बोलके डोळे क्षणात अबोल झालेआणि वडर कुटुंब दुःख सागरात बुडून गेले. सालस मनाच्या विनूची निर्मळ झऱ्यासारखी आठवण हाच आमच्या जगण्याचा आधार असल्याची भरल्या आसवांनी व्यक्त होणाऱ्या त्याच्या मातापित्यांची तगमग सर्वांना हेलावून टाकणारी ठरली.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news