

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये प्रशिक्षणादरम्यान एनसीसी कॅडेट्सना एका व्यक्तीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरुन खळबळ उडाली. याबाबत जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,"विद्यार्थ्यांना मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती शिक्षक नाही. आम्ही अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी याचा सामना केला त्यांनी घाबरू नये,". (NCC Students Thane Viral Video)
ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. एक व्यक्ती ज्युनियर विद्यार्थ्यांच्या पाठीवर मोठ्या लाकडी दांड्याने फटके देत होता. हे विदारक दृश्य महाविद्यालयाच्या कारकिर्दीला गालबोट लावणारे ठरले आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत संबंधित विद्यार्थ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि व्हीपीएम पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. मात्र शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून चूक झाल्याने त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सात ते आठ ज्युनियर विद्यार्थ्यांना चिखलाच्या पाण्यात खाली डोके टेकून उभे केले आहे. त्यानंतर त्यांच्या पाठीवर एक विद्यार्थी लाकडी दांड्याने अमानुषपणे मारत असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले आहे. (NCC Students Thane Viral Video)
गुरुवारी (दि.३) या प्रकरणासंदर्भात माध्यमांशी बोलताना जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सीनिअरवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असे प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एका कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून नये. आम्हाला येऊन भेटावे. एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये."
हेही वाचा