ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सिनियर विद्यार्थ्यांकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. एक सिनियर विद्यार्थी तालिबानी पद्धतीने ज्युनियर विद्यार्थ्यांच्या पाठीवर मोठ्या लाकडी दांड्याने फटके देत होता. हे विदारक दृश्य महाविद्यालयाच्या कारकिर्दीला गालबोट लावणारे ठरले आहे. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत संबंधित विद्यार्थ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. (NCC student assaulted)
मात्र एनसीसीचे ट्रेनिंग सुरु असताना फक्त विद्यार्थीच मैदानावर का होते? एनसीसीच्या विभागाचे प्राध्यापक कुठे होते? सिनियर विद्यार्थ्यांना ज्युनियर विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचे व मारहाण करण्याचे अधिकार कोणी दिले असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि व्हीपीएम पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. मात्र शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून चूक झाल्याने त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सात ते आठ ज्युनियर विद्यार्थ्यांना चिखलाच्या पाण्यात डोके टेकून ओणवे उभे केले आहे. त्यानंतर त्यांच्या पाठीवर एक विद्यार्थी लाकडी दांड्याने अमानुषपणे मारत असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले आहे.
एनसीसीचे युनिट हेड सीनियर विद्यार्थीच असतात. या सीनिअर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व चूक झाल्यास शिक्षा दिली जाते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सीनिअर विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यानी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नाही. असे प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी म्हंटले आहे.
विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सीनिअरवर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हे असे प्रकार यापुढे होऊन नयेत म्हणून एका कमिटीची स्थापनाही आम्ही तत्काळ करत असून ज्या कोणा विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले असतील त्यांनी अजिबात घाबरून नये. आम्हाला येऊन भेटावे एनसीसी सोडण्याचा विचार अजिबात करु नये.
– सुचित्रा नाईक, प्राचार्या, जोशी बेडेकर महाविद्यालय
हेही वाचा