Thane crime news : मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून महिलेकडून २० लाख उकळले | पुढारी

Thane crime news : मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवून महिलेकडून २० लाख उकळले

ठाणे: पुढारी वृत्तसेवा: क्राईम ब्रँचमधून बोलत असून तुमच्या नावाने आलेल्या कुरियर पार्सल मध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्यामुळे तुमच्यावर अंधेरी पोलीस ठाण्यात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने तुमच्या खात्यातील सर्व रक्कम आरआयबीकडे जमा करावी लागेल, अशी फोनवरून बतावणी करून अज्ञाताने ठाण्यातील नौपाडा परिसरात  (Thane crime news) राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेची तब्बल २० लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदार ३६ वर्षीय नोकरदार महिला गोखले रोड, नौपाडा परिसरात (Thane crime news)  राहतात. त्यांना २४ जुलै २०२३ रोजी एक फोन कॉल आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने फेडेक्स कुरीअर इंन्टरनॅशनल सर्विसेस मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे, असे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा एका अन्य क्रमांकावरून तक्रारदार यांना फोन कॉल आला. यावेळी फोन वरून बोलणाऱ्या व्यक्तीने अंधेरी क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे महिलेस सांगितले. तुमच्या नावाने आलेले एक पार्सल कस्टम येथे पकडले असून त्यात बेकायदेशीर वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तुमच्यावर अंधेरी पोलीस ठाण्यात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या आधारकार्ड क्रमांकावर हा गुन्हा दाखल झाल्याने व पुढील तपास सुरू असल्याने तुमच्या खात्यातील सर्व रक्कम आरबीआय बँकेला ट्रान्सफर करावी लागेल ,असे देखील फोन वरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून या भामट्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यावरून तब्बल २० लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नौपाडा पोलिसात फिर्याद नोंदवली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी शनिवारी अज्ञात आरोपींविरुध्द भादवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button