ठाणे : वाहतूक पोलिसांनी मानसिक छळ केल्‍याचा मेसेज करून तरूणाने जीवन संपवले | पुढारी

ठाणे : वाहतूक पोलिसांनी मानसिक छळ केल्‍याचा मेसेज करून तरूणाने जीवन संपवले

ठाणे ; पुढारी वृत्‍तसेवा मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याच्या नैराश्येतून ठाण्यात 24 वर्षीय तरुणाने जीवन संपवले. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी समोर आली. मनिष उतेकर (वय 24, वागळे इस्टेट, ठाणे) असे जीवन संपवलेल्‍या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण जीवन संपवत असल्‍याचा मेसेज मृत तरुणाने आपल्या आईला मृत्यूपूर्वी पाठवला आहे.

गटारी अमावस्येला वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या कारवाई मोहिमेत मनीषवर ठाणे वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याच्या कारणातून कारवाई केली. अन्य दोन मित्रांवरही कारवाई केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी मनिषला न्यायालयात जावे लागेल, असे सांगितले होते. मात्र न्यायालयाऐवजी जागीच दंड आकारावा अशी मागणी मनीष याने केली होती. परंतु प्रकरण न्यायालयात गेल्याने नैराश्याने व मानसिक त्रासातून मनिषने शुक्रवारी (28 जुलै) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घरातच गळफास घेत जीवन संपवले.

या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जीवन संपवण्यापूर्वी मनिषने आपल्या आईला मोबाईलवरुन मॅसेज केल्याचे समोर आले आहे. मला ट्रॅफिक पोलिसांनी पकडले होते. त्यापैकी दोघा वाहतूक पोलिसांनी करियर बरबाद करू असा दम देत तुम्हाला कोर्टात जावे लागेल अशी धमकी दिल्याचे या मॅसेज मध्ये नमूद आहे. ट्रॅफिक पोलिसांचा मान राखतो, परंतु असे कोणासोबतही वागू नका असे मनिषने आपल्या आईला पाठवलेल्या मॅसेज मध्ये नमूद केले आहे. या घटनेनंतर मृत युवकाच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या मानसिक छळामुळे मनीषने जीवन संपवले असून, दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button