ठाणे: भाजपच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो | पुढारी

ठाणे: भाजपच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : टोलनाका तोडफोडी वरून भाजप आणि मनसेमध्ये राजकारण पेटले आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात भाजपच्या बॅनरवर ठाणे मनसे आमदाराचा फोटो झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. बॅनरचा हाच फोटो आता समाज माध्यमातून व्हायरल  होत आहे.

दरम्यान कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांसाठी भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी मंजूर करून दिला आहे. १४ गावांसाठी निधी मिळवा, यासाठी मनसे आमदार राजू पाटील आणि सर्व पक्षीय विकास समितीने पाठपुरावा केला होता. त्यामुळे हा बॅनर छापल्याचे सूत्रांनी सांगितले. असे असले तरी स्थानिक राजकारणात भाजप – मनसे युती अनेकदा पाहिला मिळाली आहे.

काय आहे बॅनरवर….

कल्याण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, चिटणीस गुरुनाथ पाटील यांच्या मागणीने आणि आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चौदा गावांतील रस्त्यांना ३२ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांचे बॅनर व्हायरल झाले होते. या बॅनरमध्ये त्यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात भोपर-देसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मंत्री रवींद्र चव्हाण आणि राजू पाटील यांचे या बॅनरमधून आभार मानण्यात आले होते. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानत ट्विट सुद्धा केले होते.

हेही वाचा;

Back to top button