महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात; निकालानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा | पुढारी

महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात; निकालानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे, फडणवीस सरकारला दिलासा मिळाल्यानंतर ठाकरे गटातील उरलेले आमदार आणि खासदारही आमच्याकडे येतील. त्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील फुटीच्या उंबरठ्यावर असून महाविकस आघाडीतील आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. येणाऱ्या विधासभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येणार असल्याचेही म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे, फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागली होती. निकाल लागल्यानंतर ठाण्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधकांसह संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा असा उल्लेख करत जे लोक सरकार पायउतार होणार असे बोलत होते, त्यांना या निकालानंतर मोठी चपराक बसली आहे. संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला हवे, असा टोलाही म्हस्के यांनी राऊत यांना लगावला. विरोधकांकडून केवळ सहानुभूतीसाठी अशाप्रकारची टीका करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
येणाऱ्या विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तर उद्धव ठाकरे यांना ५० आमदार सांभाळता आले नाही, उरलेलं आमदार आणि खासदारांसमवेत महाविकास आघाडीतील आमदार देखील आमच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी म्हस्के यांनी आहे.

निकालानंतर शिवसेनेचा ठाण्यात जल्लोष…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाच्या बाहेर एकमेकांना पेढे भरवून शिवसैनिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेमध्ये गेल्यावर्षी जूनमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने हंगामी स्थगिती दिली होती. तत्त्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यास पाचारण केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तित्त्वात आले. सर्वोच्च न्यायालयाचे हंगामी आदेश, आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने शिंदे यांचे सरकार टिकल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्ट झाले. हा निकाल सकाळपासून ठाण्यातील शिंदे यांचे समर्थक पाहात होते. निकाल बाजूने लागताच त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे जल्लोष साजरा केला. तसेच पेढे भरवित एकमेकांचे अभिनंदन केले.

हेही वाचा : 

Back to top button