नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आघाडीच्या सुधाकर अडबालेंचा विजय

सुधाकर अडबाले
सुधाकर अडबाले

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजप समर्थित आमदार नागो गाणार यांचा अडबाले यांनी पराभव केला. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या सुधाकर अडबोले यांनी १६, ७०० मते मिळवली. तर भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांना ८,२११ मते मिळाली.

चंद्रपुरात सुधाकर अडबाले यांच्या विजयाचा  जल्लोष

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता शहरातील गांधी चौकात फटाके फोडून, गुलाल उधळून, पेढे वाटप करून विजयाचा जल्लोष करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चंद्रपूर येथील सुधाकर अडबाले यांना नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा देत निवडणुकीच्या मैदानात उतरविले. त्यानंतर काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अडबाले यांच्या विजयासाठी मोठे परिश्रम घेतले. अडबाले यांनी आजपर्यंत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारांनीही अडबाले यांच्यावर विश्वास टाकत बहुमताने विजयी केले आहे. सत्ताधारी भाजपला शिक्षक मतदारांनी या निवडणुकीत स्पष्टपणे नाकारले आहे. महाविकास आघाडीच्या परिश्रमाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी व्यक्त केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. गुलाल उधळत आनंद साजरा केला. तसेच नागरिकांना पेढे वाटले. यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव विजय नळे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, ओबीसी आघाडीचे प्रदेश पदाधिकारी उमाकांत धांडे, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, कुणाल चहारे, प्रवीण पडवेकर, बापू अन्सारी, दौलत चालखुरे, रमिज शेख, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, माजी नगरसेवक सागर खोब्रागडे, यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news