नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे अडबाले आघाडीवर, गाणार समर्थक चिंतेत | पुढारी

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे अडबाले आघाडीवर, गाणार समर्थक चिंतेत

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे नागो गाणार हे सतत पिछाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हे आघाडीवर असल्याची माहिती आहे. सुधाकर अडबाले यांनी सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. मात्र, नेमकी आकडेवारी अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे अडबाले समर्थकांमध्ये उत्साहाचे तर गाणार समर्थक चिंतेत दिसत आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला गुरुवारी (दि.०२) सकाळी अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. त्यानंतर सुरूवातीलाच महाविकास आघाडी समर्थित सुधाकर अडबालेंनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपच्या गोटात काहीशी चिंता निर्माण झाली. नागपुरात मुख्य मुकाबला गाणार, अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यातच आहे.

यापूर्वी पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्या लढतीत वंजारी यांनी बाजी मारली होती. त्यावेळी काँग्रेसने आपल्याला या निवडणुकीसाठी मदतीची ग्वाही दिली होती, पण तो शब्द पाळला नसल्याचे दुःख झाडे यांना आजही आहे. मविआचे समर्थन झाडे ऐवजी अडबाले यांना देण्याचा निर्णय योग्य की अयोग्य याचाही फैसला या निकालात होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button