ठाणे : पुढारी वृत्तसेवा : देशात अराजकता माजवण्याचा आणि देशाला बदनाम करणाऱ्या ' द केरला स्टोरी' या सिनेमाच्या निर्मात्याला फाशी दिली पाहिजे, हे आपले विधान संतापाचा कडेलोट होता. आपणाकडून व्यक्त झालेला शाब्दिक संताप होता. केरळमध्ये फक्त तीन मुली पळाल्या असताना ३२ हजार मुली पळून गेल्याची खोटी माहिती सांगून धार्मिक विद्वेष पसरविणार्या चित्रपटाच्या (The Kerala Story) निर्मात्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज (दि. ९) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज केरळ (The Kerala Story) भारतातील पूर्ण साक्षर राज्य म्हणून पुढे आहे. आज तिथे ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम हे तिघेही संख्येने कमी अधिक प्रमाणात सारखेच असले तरी तिथे कधीही टोकाचे जातीयवाद झाल्याचे दिसत नाही. आजमितीला तिथे बालमृत्यूचा दर फक्त सहा टक्के आहे. उलट उत्तर प्रदेशात ४६ टक्के आहे. परदेशातून जे परकीय चलन भारतात येते. त्यातील ३६ टक्के चलन हे केरळमधील परदेशी असलेले अनिवासी भारतीय पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी २.३४ लाख कोटी रूपये पाठविले होते. दरडोई उत्पन्न हे भारताच्या सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक आहे. याचा अर्थ तेथील माणूस हा इतर राज्यातील नागरिकांपेक्षा श्रीमंत आहे. दारिद्रयरेषेखालील भारताची सरासरी जेव्हा २२ आहे. तेव्हा तिथे फक्त ०.७६ टक्के लोक हे दारिद्रय़रेषेखाली आहेत.
सिनेमा काल्पनिक होता म्हणून आपण ३२ हजार मुलींनी धर्मांतरण केले, असे कोर्टात सांगतात. अशा वेळेस बोलताना आपण त्याला फाशी दिली पाहिजे, असे म्हटले. त्याचा शब्दशः अर्थ घेऊन अनर्थ करण्यात आला. या एका वाक्यावर वाद निर्माण करायचे, असे प्रकार करण्यात येत आहेत. या सिनेमाने देशाची बदनामी केली आहे, याची दखलच कोणी घेतली नव्हती. नशिब आपण ते विधान केले म्हणून या सिनेमातील चुकीच्या गोष्टी समोर आल्या.
या सिनेमा टीझर पहा, त्यामधून तो निर्माता खोटी माहिती देशभर पसरवत आहे. त्यामुळेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आज मणीपुरमध्ये सिव्हिल वॉर सुरू झाले आहे. ते आपण दाखवत नाही. पण, आपण हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्यात धन्यता मानत आहोत. त्यातून मते मिळणार आहेत, म्हणून जगात काय चाललंय या पेक्षा हिंदू-मुस्लीम वाद अधिक पेटवला जात आहे. लोकांच्या मनात द्वेष निर्माण का करीत आहात ? तीनचे ३२ हजार करून केरळ आणि देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्यावर कोणीही बोलायला तयार नाही, हे कसे चालेल? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.
हेही वाचा