रोशनी शिंदेला ठाकरे-आव्हाडांकडून धोका, शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र | पुढारी

रोशनी शिंदेला ठाकरे-आव्हाडांकडून धोका, शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र

ठाणे : पुढारी वृत्तसेवा –  ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या जीवाला आता उद्धव ठाकरे गटातील नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका असल्याचा दावा केला. तिला पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु आधी तिची तक्रार तर दाखल करुन घ्या, असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी रोशनी शिंदे हिच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे अख्खे कुटुंब ठाण्यात येऊन गेले. तर बुधवारी तिच्यासाठी महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला होता. यातूनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अजब मागणीनंतर यात आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे.

रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकारावरुन हेच सिद्ध होत आहे की, रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्ट्रवादीचा गट सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच रोशनी हिच्या जीवाला धोका असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यातही या महिलेची प्रकृती चांगली असून केवळ तिच्या आधारे सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे तिला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दुसरीकडे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, राजकारण बाजूला राहू द्या. विचार करा, स्त्रीचे पूर्णत्व हे मातृत्व असते. तिला लाथा बुक्यांनी मारहाण झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे. ताई रोशनी तुमची बहिण आहे. कमीत कमी तिची तक्रार तर नोंदवून घ्यायला सांगा, असा सल्ला त्यांनी दिला.

Back to top button