सुसंस्कृत ठाण्याची ओळख ‘गुंडाचं ठाणं’ करण्याचा प्रयत्न सुरू : उद्धव ठाकरे | पुढारी

सुसंस्कृत ठाण्याची ओळख 'गुंडाचं ठाणं' करण्याचा प्रयत्न सुरू : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुसंस्कृत ठाण्याची ओळख पुसून ‘गुंडाचं ठाणं’ अशी ठाण्याची ओळख करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनात आणलं तर या क्षणाला त्यांची गुंडगिरी ठाण्यातून आणि राज्यातून मुळासकट उखडून टाकण्याची हिम्मत शिवसैनिकांमध्ये आहे. महिला गुंडांकडून हल्ले करणारे न्यायालयाने म्हणल्याप्रमाणे नपुसंकच आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदेंवरील झालेल्‍या हल्‍ल्‍याचा निषेध केला. राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था पूर्णपणे उद्‍ध्‍वस्‍त झाली आहे, असा आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्‍यावा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भेट घेवून विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे पोलिस आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. पण आयुक्त उपस्थित नसल्याने त्यांची भेट झाली नाही. यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सरकार बद्दल नपुसंक असा शब्द वापरला होता, त्याची प्रचिती काल आली. सरकारच नपुसंक म्हटल्यानंतर कोणाकडून अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. सुसंस्कृत ठाण्याची ओळख पुसून ठाण्याची ओळख गुंडाचं ठाणं अशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या तर देशाच, राज्याच आणि ठाण्याच काय होणार, असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकूण घ्यायचं अस चालणार नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर या क्षणाला त्यांची गुंडगिरी ठाण्यातून आणि राज्यातून मुळासकट उखडून टाकू शकतो, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.

ज्या गुंड महिलांनी हल्ला केला आहे, अशा महिला आपल्या संस्कृतीत बसत नाहीत. गुंडगिरी वाढत चालली आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांवर हल्ले होत असताना सरकार गप्प आहे. ज्यांच्या नावाने यात्रा काढता त्यांचे विचार जर रक्तात नसतील तर गौरव यात्रा काढू नका, अन्यथा आमचे सरकार आल्यानंतर या सर्वांना जेलयात्रा करावीच लागेल. पोलिसांचे कर्तव्य करण्याची हिम्मत नसेल तर आयुक्तांनी पदावरून दूर व्हावं किंवा कडक कारवाई करावी. लाचार गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. फडणवीसांनी झेपत नसेल तर महाराष्ट्रातील जनतेशी प्रामाणिक राहून राजीनामा द्यावा, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button