रोशनी शिंदेंना मारहाण नाही : माजी महापौर मीनाक्षी शिंदे | पुढारी

रोशनी शिंदेंना मारहाण नाही : माजी महापौर मीनाक्षी शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका महिलेला पुढे करून तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून बदनामीचे राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना वादात खेचण्यासाठी निराधार आरोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झालेली नाही. रोशनी यांना समजविण्यासाठी गेले होते, हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असा खुलासा शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आज (दि. ४) पत्रकार परिषदेत केला.

या वेळी मीनाक्षी शिंदे म्हणाले की, “रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा बाऊ केला जात आहे. शिंदे गटाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून खोटं प्रकरण रचण्यात आले आहे. रोशनी शिंदे यांचे फेसबुकवर नाचण्याचे व्हिडीओ आहेत. त्या गर्भवती नाहीत. मारहाण झाली तर रोशनी शिंदे चालत पोलीस ठाण्यापर्यंत कशा गेल्‍या. चालत जाऊन रूग्णालयात अॅडमिट झाल्यानंतर सिरीयस होतात. यामध्ये काय तर गौडबंगाल आहे.”

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडत नव्हते. परंतु आता ते रोशनी शिंदे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. रोशनी शिंदे या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याविरोधात नेहमी आक्षेपार्ह पोस्ट टाकत होत्या. याबाबत त्यांना केवळ जाब विचारण्यासाठी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्या गेल्या होत्या. यावेळी त्‍यांना मारहाण करण्यात आलेली नाही. राजन विचारे यांनी त्यांना जबरदस्तीने रूग्णालयात दाखल केले आहे,असा आरोपही मिनाक्षी शिंदे यांनी केला.

रोशनी शिंदेंना गंभीर दुखापत नाही : डॉ. आलेगावकर

रोशनी शिंदे यांच्यावर उपचार करणारे डॉ. आलेगावकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, रोशनी शिंदे यांची प्रेग्नेंट टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. पोटातही मारहाण झालेली नाही. कोणतेही फॅक्चर झालेले नाही केवळ मुका मार लागला आहे. त्यांच्या जीवितास धोका नाही; पण खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button