वानवडी पोलिस ठाणे अद्यापही हद्दीबाहेर! | पुढारी

वानवडी पोलिस ठाणे अद्यापही हद्दीबाहेर!

सुरेश मोरे :

वानवडी : पुढारी वृत्तसेवा : वानवडी परिससरातील पोलिस चौक्यांचे रूपांतर काही वर्षांपूर्वी पोलिस ठाण्यात झाले आहे. मात्र, हे पोलिस ठाणे अद्यापही हडपसर औद्योगिक भागात असून, ते वानवडीच्या हद्दीत उभारण्यात आलेले नाही. चौक्या कॅन्टोन्मेंटमध्ये, तर ठाणे हडपसर हद्दीत, अशी स्थिती सध्या या ठाण्याची आहे. यासाठी कोणी ठोस पाठपुरावा केला नाही आणि आमच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन उदासीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वानवडी परिसरात नागरिकरणचा विस्तार दिवसेदिंवस झापाट्याने होत आहे. या भागात विविध व्यवसाय व बाजारपेठांची निर्मिती झाली आहे. नामांकित हॉस्पिटल, शाळा, हॉटेल या परिसरात आहेत. मात्र, परिसरातील लोकांची सुरक्षितता पाहणारे वानवडी पोलिस ठाणे मात्र हडपसर परिसरात आहे. या ठाण्यातंर्गत येणार्‍या काही पोलिस चौक्या कॅन्टोन्मेंट व महंमदवाडी हद्दीत येतात. यामुळे पोलिसांना या भागातील सुरक्षाव्यवस्थेचे काम पाहताना विविध अडचणी येत आहेत.

वानवडी परिसरात एखादी गुन्ह्याची घटना घडल्यास पोलिसांना रेल्वेगेट ओलांडून या भागात यावे लागते. हडपसर व वानवडी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. ती पार करून पोलिस आधिकारी गुन्ह्याच्या ठिकाणी वेळेवर पोहचतील की नाही, याची खात्री नसते. पोलिस चौक्या तरी वानवडी भागातच असायला हव्या होत्या. मात्र, त्या देखील लांब आहेत. नागरिकांना एखादी तक्रार वरिष्ठ पोलिस आधिकार्‍यांकडे द्याची असेल, तर किमान पाच किलोमीटर अंतर पार करून हडपसर परिसरातील वानवडी पोलिस ठाण्यात जावे लागत आहे. या ठिकाणी बसने जायची सोय नसून, रिक्षाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यासह विविध समस्यांचा समान करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पोलिस ठाणे वानवडीत व्हावे…

वानवडी परिसरात सोनसाखळी चोरीसह विविध गुन्हे घडत आहेत. बाजारपेठा वाढल्याने पैशाची उलाढालही वाढली आहे. यामुळे या भागात आता गुन्हेगारी आपसूकच डोके वर काढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर हद्दीत असलेले पोलिस ठाणे वानवडी परिसरात सुरू करावे, जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कामकाज पाहणेदेखील पोलिसांना सोपे होईल, अशी मागणी वानवडीकरांकडून होत आहे.

वानवडीतील लोकांना पोलिसांची मदत हवी असेल किंवा कामासाठी वरिष्ठ आधिकार्‍यांना भेटायचे असेल, तर हडपसर औद्योगिक भागात जावे लागत आहे. नागरिकांच्या हितासाठी या पोलिस ठाण्याची उभारणी वानवडीच्या मध्यवर्ती भागात होणे गरजचे आहे.
                                                      -अनुप दीक्षित, रहिवासी, वानवडी

वानवडी परिसरात पोलिस ठाण्यासाठी कोणती जागा राखीव आहे, याची पाहणी करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव लवकरच वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे.
                  – भाऊसाहेब पठारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे

Back to top button