Exam : १० वी, १२ वीच्या सहा टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोर्‍या; निकालाचा टक्का घसरणार | पुढारी

Exam : १० वी, १२ वीच्या सहा टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोर्‍या; निकालाचा टक्का घसरणार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका पहिल्या फेरीत तपासून झाल्या असून, शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये सहा टक्के विद्यार्थ्यांनी पेपर कोरा सोडल्याचे चित्र पुढे येत आहे. यामुळे यंदाच्या वर्षी निकालाचा टक्का घसरण्याची भीती आहे. कोरोना काळात सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा हा परिणाम असून, उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांनी ही कैफियत सांगितली आहे. (Exam)

मागील वर्षी कोरोनाच्या भीतीमुळे शाळा तिथे परीक्षा केंद्र या तत्त्वावर परीक्षा घेण्यात आल्या. मात्र यंदा पूर्वीप्रमाणेच शिस्तबद्ध वातावरणात बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256, तर बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले होते. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले, तर भरारी पथकांची संख्याही वाढविण्यात आली होती. तरीही बारावीत 260 आणि दहावीच्या 113 केंद्रांवर गैरप्रकारांची नोंद झाली. 10 ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. (Exam)

दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम शिक्षकांनी 27 मार्च पूर्वीच पूर्ण केले आहे. या उत्तरपत्रिकांमध्ये 6 टक्के विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोर्‍याच राहिल्या आहेत. कोरोनात दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची पाटी कोरीच राहिली होती. मागील वर्षी शाळा तेथे परीक्षा केंद्र या तत्वावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाटी कोरी असलेल्या विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होण्याची संधी मिळाली.

दोन वर्ष शिक्षणाचा कित्ता न गिरवलेले विद्यार्थी यावेळी दहावी बारावीच्या परीक्षांना बसले होते. त्यामुळे पेपर कोरा सोडणे, प्रश्नपत्रिकेतील मजकुरच उत्तरपत्रिकेत लिहिणे अशा उत्तरपत्रिकांचे प्रमाण 6 टक्के एवढे आढळून आले. विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत म्हणून तोंडी परीक्षेचे 20 गुण शाळा देते, तर 15 मार्क लेखी परीक्षेत मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मात्र विद्यार्थ्यांना ते ही न जमल्याने लेखी परीक्षेत पहिल्या तपासणीत शून्य गुण मिळाले असून, यामुळे दहावी-बारावीचा निकाल घसरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा :

Back to top button