सावधान, तुमच्यासोबतही असं होऊ शकतं! तरुणाला पावणे दोन लाखांचा गंडा, क्रेडिट कार्डची माहिती घेऊन केली फसवणूक | पुढारी

सावधान, तुमच्यासोबतही असं होऊ शकतं! तरुणाला पावणे दोन लाखांचा गंडा, क्रेडिट कार्डची माहिती घेऊन केली फसवणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका १९ वर्षाच्या तरुणाला सायबर चोरट्याने क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन १ लाख ६८ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी मुंबईतील एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण शिक्षणासाठी पुण्यात आला होता. विमाननगर येथील साकोरेनगर येथील एका हॉस्टेलमध्ये रहात असताना ८ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याला एक फोन आला. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण महिंद्र क्रेडिट कार्डमधून बोलत असल्याचे सांगितले. त्याच्याकडील क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर त्याच्या बँक खात्यातून १ लाख ६८ हजार ३०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली. ही बाब त्याने आपल्या आई वडिलांपासून लपवून ठेवली. मुंबईला परत गेल्यावर जेव्हा त्याच्याकडे पैशांबाबत विचारणा झाल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हा प्रकार पुण्यात घडला असल्याने तो विमानतळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. शिक्षणासाठी पुण्यात असताना हा प्रकार घडला असून पोलीस निरीक्षक संगिता माळी तपास करीत आहेत.

Back to top button