कल्याण- डोंबिवलीतून २९ सापांना पकडून सुरक्षितस्थळी सोडले | पुढारी

कल्याण- डोंबिवलीतून २९ सापांना पकडून सुरक्षितस्थळी सोडले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: कल्याण – डोंबिवली परिसरात पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अतिप्रचंड ऊन अशा प्रकारचे वातावरण आहे. या संमिश्र वातावरणाच्या बदलामुळे सर्वत्र सर्प दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कल्याणमध्ये १२ साप तर डोंबिवलीत १७ साप सर्पमित्रांनी पकडून सुरक्षितस्थळी सोडले. कल्याण येथून १ नाग आणि १ घोणस पकडण्यात आले असून डोंबिवलीत ५ नाग पकडण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याणमध्ये 7 धामण , 1 हरण टोळ , 1 नाग,1 घोणस , 1 पाण्यातील दिवड, 1 कुकरी या सापांना पकडले गेले असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. तर डोंबिवलीत 1 धामण आणि 1 डूरक्या घोणस पॉज संस्थेतर्फे पकडण्यात आले. तर सेवा या संस्थेतर्फे 7 धामण 5 नाग, 2 दिवड, 1 डुरक्या घोणस पकडण्यात आले. सध्या उन्हाळा वाढत आहे. तर रात्री अवकाळी पाऊस पडत आहे. या सगळ्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी सर्प सुरक्षित जागेच्या शोधात असतात. त्यातच अडचणीच्या जागा असतील, तर त्यांना तेथे लपून बसणे सोपे होते. तसेच किटक, उंदीर, पाल या सारखे प्राण्यांचे खाद्य सर्पांना मिळते.

डोंबिवली पूर्वेतील नेकणी पाडा परिसरात असलेल्या एका गॅरेजमध्ये आज (दि.२०) सकाळी एक डुरक्या घोणस आढळून आला. पॉज या संस्थेकडून या सापाची सुटका करण्यात आली. हा डुरक्या घोणस एक ते दोन महिन्याचा असल्याचे पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले. तर आज दुपारी चार फूट धामणीची सुद्धा डोंबिवलीतील गांधीनगर परिसरातून पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर उसर घर, संदप, आयरे गाव या ठिकाणाहून नाग पकडल्याची माहिती सेवा संस्थेतर्फे देण्यात आली.

परिसरात किंवा इमारतीच्या बाहेर सर्प आला की, सुरुवातीला नागरिक घाबरून त्यांना मारत असे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बोलवून घेत असे. मात्र, आता सर्पमित्रांमुळे अग्निशमन विभागाचे काम कमी झाले आहे.
– नामदेव चौधरी, मुख्य अग्निशमन दल अधिकारी, कल्याण

हेही वाचा 

Back to top button