डोंबिवलीत इमारतीला तडे; २४० कुटुंबांचे स्थलांतर | पुढारी

डोंबिवलीत इमारतीला तडे; २४० कुटुंबांचे स्थलांतर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : अरे भिंतीला तडा गेला आहे. अरे सगळ्यांनी बाहेर या. कधीही इमारत कोसळेल, असा एकच गोंधळ डोंबिवली परिसरातील शांतीउपवन या इमारतीत ऐकू येत होता. इमारतीला अचानक तडे गेल्याने रहिवाशांनी तत्काळ इमारत खाली केली. मात्र, इमारतीत राहणारे दहावी बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा जीव मेटाकुटीस आला होता. तर रातोरात छप्पर उडाल्याने आता राहायचे कुठे ? असा प्रश्न सोसायटीतील जवळपास 250 कुटुंबांना सतावत होता.

शांती उपवन सोसायटीत शनिवारी रात्री इमारतीला तडे गेल्याने एकच गोंधळ उडाला. रहिवाशांनी इमारत तातडीने खाली केली. असे असले तरी रहिवाशांचे सामान आणि मौल्यवान वस्तू घरातच अडकून पडल्याने सर्वच जण चिंतेत होते. यावेळी महापालिका अधिकारी आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रहिवाशांचे सामान काढले. तरीही अद्यापही एफ विंग मधील सामान काढणे अतिशय कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 42 कुटुंब हवालदील झाले आहेत. राहायचे कुठे असा मोठा प्रश्न या रहिवाशांना सतावत आहे. सद्यस्थितीत या रहिवाशाची पालिका प्रशासनाकडून खाण्यापिण्याची तसेच संक्रमण शिबिरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

इमारत २० वर्षे जुनी झाल्यानंतर रहिवाशांकडून विकासकाकडे इमारतीच्या दुरुस्ती आणि पुर्नबांधणीसाठी पाठपुरावा केला जात होता. मात्र विकासकाने दुर्लक्ष केल्यानेच २४० कुटुंबे आज विस्थापित झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या परिसरातील आजूबाजूच्या इमारतीचे देखील कधी छत कोसळते. तर कधी प्लास्टर खाली येते. त्यामुळे या संपूर्ण परिसरात स्ट्रक्चरल ऑडिट करा, असा आदेश आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. इमारतीच्या कमिटीने हे ऑडिट केले नाही तर महापालिकेतर्फे हे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा 

Back to top button