Ram Mandir : राम मंदिराचे काम वेगात सुरू : अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद महाराज | पुढारी

Ram Mandir : राम मंदिराचे काम वेगात सुरू : अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद महाराज

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : राम मंदिराचे काम वेगात सुरू आहे. जानेवारी २०२४च्या तिसऱ्या आठवड्यात राम लल्लांची त्यांच्या मूळ जागेवर स्थापना करण्यात येईल. ही स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार, असे सुतोवाच अयोध्या राम मंदिरचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी डोंबिवलीत केले. गोविंद  महाराज डोंबिवलीत विविध कार्यक्रम आणि वास्तूच्या उद्घाटनासाठी बुधवारी
( दि. १५) आले होते.

एका खाजगी रुग्णालयात उद्घाटन प्रसंगी  गोविंद  महाराज म्‍हणाले,” लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर बांधणीचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. भगवान राम लल्लानी खूप दिवस कपड्यांच्या मंडपात काढले. सध्या छोट्या स्वरूपातील मंदिरामध्ये ते आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या मूळ स्थानी बसवावे यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहोत.” .

गोविंद गिरी महाराज हे डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटनाला आल्याने डोंबिवली शहरात बरीच चर्चा रंगली होती. मात्र या संदर्भात महाराजांना विचारले असता त्यांनी अध्यात्म आणि विज्ञान या हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरची समृद्धी आणि अंतःकरणातील शांती या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, असेही ते म्‍हणाले. जी जी हिंदूस्थळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्या सर्वच हिंदू स्थानांचा पुनरुद्धार व्हावा, असे मत त्यांनी श्री मलंगगड संदर्भात व्यक्त केले.

डोंबिवलीत हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेची सुरुवात झाली. भारत हा पुनरुत्थाननाच्या मार्गावर चालत आहे. त्याचा आरंभ झाला आहे. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपला देश जगाला व्हॅक्सिन वाटणारा देश झाला आहे. बदललेली ही प्रतिमा आहे दाखवून देत आहे, की भारताची प्रगती होत आहे. सर्व जगात आयुर्वेद आणि भारतीय संगीत देखील पोहचले. ही सांस्कृतिक क्रांती आहे, असेही त्‍यांनी या  वेळी नमूद केले.

हेही वाचा :

Back to top button