पुणे : कृषी स्टार्टअपसाठी 25 लाखांचे अनुदान; 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार | पुढारी

पुणे : कृषी स्टार्टअपसाठी 25 लाखांचे अनुदान; 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशातील तरुण किंवा शेतकर्‍यांनी कृषीशी निगडित कोणत्याही प्रकारचा स्टार्टअप सुरू केला असेल, या स्टार्टअपमध्ये काही तरी नावीन्य असेल; तर केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 5 किंवा 25 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. यासाठी येत्या 31 मार्चअखेरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे (रफ्तार) प्रमुख
डॉ. अशोक बारीमुल्ला यांनी येथे केले.

राज्यातील विविध कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कृषी संशोधन केंद्राच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी डॉ. बारीमुल्ला यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी कांदा व लसूण संशोधन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. विजय महाजन, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. कौशिक बॅनर्जी, भारतीय फलोत्पादन संशोधन आणि संस्थेचे व्यवस्थापक डॉ. के. पी. प्रसाद उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक नावीन्यपूर्ण कृषी स्टार्टअप सुरू केलेले युवक, महिला, शेतकरी उपस्थित होते.

देशातील युवक, बेरोजगार तरुणांना व शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विविध कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या व अन्य वैयक्तिक स्वरूपातदेखील एकादा नावीन्यपूर्ण, अभिनव संशोधन करणारा, रोजगारनिर्मिती करणारा कोणत्याही प्रकारचा कृषी स्टार्टअप करणा-यांना 5 किंवा 25 लाखांचे अनुदान दिले जाते.

राज्यात आतापर्यंत 48 विविध प्रकारच्या स्टार्टअपसाठी या योजनेंतर्गत तब्बल 5 कोटी 62 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. यासाठी चालू आर्थिक वर्षांत अनुदान मिळण्यासाठी शासनाच्या www. circotrabi. com या संकेतस्थळावर येत्या 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

दरम्यान, या वेळी अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती कांदा, लसूण संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव बळीराम काळे यांनी दिली. तसेच अनुदानासाठी कोण पात्र होऊ शकते, अर्ज कसा करायचा या संदर्भात राष्ट्रीय कृषी विकास योजना (रफ्तार)च्या ज्योती लाड यांनी माहिती दिली.

शेतीमध्ये तरुण व नवीन पिढी येण्याची आता काळाची गरज आहे. यासाठी शेतीमध्ये उद्योग शोधले पाहिजेत, शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्न मिळाले पाहिजे. गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये अनेक खेड्यापाड्यांत तरुण, युवा शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन शोधले. पण, त्याचे व्यावसायिकीकरण झाले नाही. विविध कृषी विज्ञान केंद्रांच्या वतीने सुरू असलेल्या अ‍ॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून यासारख्या कृषी स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येते.

                   – डॉ. विजय महाजन, व्यवस्थापक, कांदा व लसूण संशोधन केंद्र

Back to top button