पिंपरी : विना करवाढीचा ‘संकल्प’सादर; पालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प | पुढारी

पिंपरी : विना करवाढीचा ‘संकल्प’सादर; पालिकेचा 7 हजार 127 कोटींचा अर्थसंकल्प

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय राजवटीतील कोणतीही करवाढ नसलेला आणि नव्या योजना व प्रकल्प नसलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.14) सादर केला. मूळ 5 हजार 298 कोटी 30 लाख आणि केंद्र व राज्य शासनाचे अनुदान धरून 7 हजार 127 कोटी 88 लाखांचा अर्थसंकल्प आहे.

मार्चअखेरपर्यंत 100 एमएलडी पाणी देण्याचा नवा मुहूर्त
आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधार्‍यावरून दररोज 100 एमएलडी पाणी महापालिका उचलत आहे. त्यासाठीची सर्व यंत्रणेची तयारी ऑक्टोबर 2022 ला पूर्ण झाली आहे. मात्र, उद्घाटनासाठी नेता उपलब्ध होत नसल्याने ते पाणी शहराला दिले जात नाही. त्यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, चिखली जलशुद्धीकरण केंद्र, शुद्धीकरण यंत्रणा, शहरातील जलवाहिन्या जोडणे, व्हॉल्व्ह, पाणीपुरवठा व्यवस्थापन आदींची चाचणी पूर्ण झाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हे पाणी चिखली परिसरातील भागांना पुरविले जाईल, असा नवा मुहूर्त त्यांनी आता दिला आहे.

खाली आंदोलन; वर अर्थसंकल्पाचे सादरीकरण
जुनी पेन्शन योजना सुरू करावी, या मागणीसाठी महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेकडो कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन सुरू होते. वर तिसर्‍या मजल्यावर आयुक्त शेखर सिंह हे अधिकार्‍यांना घेऊन महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करीत होते. या परस्पर विरोधी घटनेची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. तसेच, अर्थसंकल्पाबाबत पालिकेच्या अनेक अधिकार्‍यांत उत्सुकता दिसून आली नाही.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

रुपया असा खर्च होणार
सामान्य प्रशासन- 1251.39
नियोजन व नियमन – 166.47
सार्वजनिक बांधकाम- 1453.33
आरोग्य – 372.12
स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन – 478.42
नागरी सुविधा – 561.69
शहरी वनीकरण – 518.64
शहरी गरिबी निर्मूलन व समाजकल्याण (महसुली व भांडवली) – 171.97
इतर सेवा – 244.92
महसूल – 73

रुपया असा जमा होणार

आरंभिची शिल्लक – 5.70
स्था.सं.कर (एलबीटी)- 11
वस्तू व सेवाकर- 2213
करसंकलन – 850
गुंतवणुकीवरील व्याज व
इतर – 124
पाणीपट्टी व इतर – 88
बांधकाम परवानगी
विभाग – 950
अनुदाने – 341.17
भांडवली जमा – 601
इतर विभाग जमा- 108.13

विकासकामे भांडवली खर्च
स्थापत्य 1 हजार 52 कोटी 62 लाख
भूसंपादन – 120 कोटी
विद्युत – 67 कोटी 4 लाख
पाणीपुरवठा – 42 कोटी 57 लाख
पाणीपुरवठा विशेष निधी – 154 कोटी 75 लाख
जलनि:स्सारण – 40 कोटी
पर्यावरण – 35 कोटी 28 लाख
राखीव निधी (प्रत्येकी 5 टक्के):
मागासवर्गीय कल्याणकारी योजना – 51 कोटी 45 लाख
क्रीडा निधी – 70 कोटी 44 लाख
महिलांसाठी – 48 कोटी 54 लाख
दिव्यांग – 44 कोटी 70 लाख

प्रथमच समितीविना अर्थसंकल्प
महापालिका बरखास्त झाल्याने नगरसेवक व पदाधिकारी सध्या नाहीत. त्यामुळे यंदा स्थायी समिती नसल्याने अर्थसंकल्प प्रशासक असलेल्या आयुक्तांकडे लेखा विभागाने सादर केला. त्यांनी तो स्वीकारला. आयुक्तांनी लगोलग स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचीही मान्यता दिली. त्यामुळे हा अर्थसंकल्प आहे तसा मंजूर झाला आहे. सध्या सन 2022-23चा सुधारित अर्थसंकल्प लागू झाला आहे. एक एप्रिलपासून सन 2023-24 चा अर्थसंकल्प लागू होईल, असे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

क्षेत्रीय कार्यालय तरतूद
अ – 23 कोटी 35 लाख
ब – 15 कोटी 88 लाख
क – 9 कोटी 90 लाख
ड – 17 कोटी 11 लाख
ई – 7 कोटी 9 लाख
फ – 15 कोटी 65 लाख
ग – 20 कोटी 10 लाख
ह – 32 कोटी 46 लाख

Back to top button