ठाणे: उन्हाचा चटका वाढला, मुरबाडमध्ये कलिंगड्यांना मागणी | पुढारी

ठाणे: उन्हाचा चटका वाढला, मुरबाडमध्ये कलिंगड्यांना मागणी

मुरबाड: पुढारी वृत्तसेवा : मुरबाड तालुक्यातील मुरबाड शहरासह ग्रामीण भागात उष्णतेचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिक थंड पेयांकडे वळू लागले आहेत. त्यातच आरोग्यदायी कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. तालुक्यातील शिरगाव परिसरात काही शेतकरी कलिंगडाची शेती करतात. शेतांच्या जवळच मुरबाड- वासिंद रस्त्यावर कलिंगडे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सध्या २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या कलिंगड्यांची खरेदी करण्यास नागरिकांकडून पसंती मिळत आहे.

४ किलो पासून १२ किलो पर्यंत फळांचे वजन आहे. फळे तोडल्यानंतर ती सुकत ठेवतो. त्यामुळे वजन घटते, त्यामुळे आम्हाला कमी पैसे मिळतात, परंतु फळाचा दर्जा चांगला होतो. फळ खाण्यास रवेदार व चवीला गोड लागत असल्याने ग्राहक संतुष्ट होतात, असे शिरगाव येथील शेतकरी बळीराम भवार्थे यांनी सांगितले.

स्थानिक लोक शेतात कलिंगडाची लागवड करतात. तेथून मुरबाड शिरगाव चिखले रस्त्यावर मंडप टाकून विक्री केली जाते. त्यामुळे कलिंगड वाहतुकीचा खर्च, हमाली असा बराचसा खर्च वाचतो. त्यामुळे वीस रुपये किलो प्रति दर मिळाला. तरी आम्ही त्यात समाधान मानतो आणि आम्हाला चांगला फायदा होतो, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

पूर्वी मुरबाड तालुक्यात किशोर, असोले, करवेळे तसेच मुरबाड शहरातील भागात कलिंगड लागव ड मोठ्या प्रमाणात केली जात होती. भात पिकाची कापणी झाल्या नंतर शेतात कलिंगडाची लागवड केली जात होती. याला कलिंगडाची काशी असेही म्हणतात. गावातील दोन तीन शेतकरी एकत्र येऊन कलिंगड लागवड करत होते. व फळे विक्री होईपर्यंत त्यांचा मुक्काम शेतामध्ये मांडवात असे. शिवरात्रीच्या सुमारास फळे तयार होत. बैल गाडीतून ती विक्रीसाठी बाजारात आणली जात होती. या पिकांना खत देण्याऐवजी गुरांचे शेण, खाटी वापरली जात होती. त्यामुळे फळांचा गर एकदम घट्ट व चवीला गोड लागत होता, असे शेतकरी सरल गायकर यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button