ठाणे: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू; सीआयडी चौकशी होणार | पुढारी

ठाणे: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू; सीआयडी चौकशी होणार

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मुलाला पोलिसांनी अटक केल्यानंतर कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विचारपूस करायला आलेल्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भिंगारदिवे असे मृत वडिलांचे नाव असून ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. पोलिसांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. तर पोलीस ठाण्यात चक्कर आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. तर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट करत पोलिसांवर आरोप केला आहे.

ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान, कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे प्रितेश भिंगरदिवे याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी चौकशीसाठी आणले होते. यावेळी प्रितेशचे वडील दीपक संभाजी भिंगारदिवे हे आपल्या मुलाला पोलीस स्टेशनला का आणले आहे ? याची विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. मुलगा प्रितेश याला का अटक करण्यात आली अशी विचारपूस पोलिसांना करत असताना दीपक भिंगारदिवे हे त्यांच्या मोबाईलमधून शूटिंग करत होते. याचवेळी त्यांच्याशी पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांना ठाणे अंमलदार कक्षाच्या मागे बसवण्यात आले.

यावेळी दीपक भिंगारदिवे यांना फिट आल्याने ते तेथेच कोसळले. मात्र पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे नातेवाईक करत आहेत. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत कारणाशिवाय ताब्यात घेऊन पोलिसांनी मारहाण केली, असा दावा केला आहे. ते लोक उपस्थित होते आणि ज्यांनी त्याला आणले त्या सर्वांचे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नका, अशी विनंती ही त्यांनी केली आहे. यासंदर्भात सीआयडी च्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून दीपक यांचा पंचनामा आणि शवविच्छेदन चीफ जुडीशियल मॅजिस्ट्रेट यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून होणार असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button