

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्याच्या सभेत पाकीटमारी Wallet Stolen) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर मधील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश नाथानी यांच्यासह अन्य एका व्यक्तीची पाकिट चोरी झाली आहे.
बुधवारी (दि. १५) उल्हासनगर महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमाच्या उदघाट्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्री येणार असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तब्बल ५०० पेक्षा अधिक पोलीस तैनात होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, जगदीश सात, दहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ३४ पोलीस उप निरीक्षक आणि शेकडो पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. असे असताना देखील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश नाथानी आणि उत्तर भारतीय समाजाचे अनिल पांडे यांच्या खिशातून त्यांचे पाकीट चोरण्यात आल्याची घटना घडली आहे. अनिल पांडे यांच्या खिश्यातून तब्बल ३२ हजार रुपये आणि कागदपत्रे चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी प्रकाश नाथानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा