ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; विकासासाठी १२६१ कोटींचा निधी | पुढारी

ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; विकासासाठी १२६१ कोटींचा निधी

उल्हासनगर : पुढारी वृत्तसेवा : मुख्‍यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते उल्हासनगर शहरात विविध प्रकल्पाच्या लोकार्पण झाले. अवघ्या सहा महिन्यांमध्‍ये विविध योजनांमधून शहराच्या विकासासाठी १२६१ कोटी रुपये दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले. उल्हासनगर महापालिकेने सी ब्लॉक येथील मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

या वेळी केंद्र शासनाच्या अनुदानातून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ८६ गाड्यांच्या समावेश होता. त्यामध्ये ५४ घंटागाड्या आहेत. या सर्व गाड्यांची एकूण किंमत २२ कोटी ७२ लाख रुपये आहे. यामध्ये पॉवर स्वीपिंग मशीन, स्ट्रीट लाईट मशीन, सक्शन मशीन आदी वाहनांच्या समावेश आहे.

८ दशलक्ष लीटर क्षमतेच्या खडेगोलवली येथील मलशुद्धिकरण केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आले विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन, दिव्यांग व्यक्तींच्या ऑनलाईन नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर आणि रिजेन्सी निर्माणने दिलेल्या प्लॅस्टिक क्रशर मशीनचे वर्च्युअल लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

रस्त्यांच्या काँक्रिटिकरणासाठी ४५० कोटी, नाले बांधकामासाठी २५० कोटी, संक्रमण शिबिर २० कोटी रुपयांच्या विकासकामांची प्रलंबित संचिका मार्गी लावण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले की, “१२६१ कोटी रुपयांच्या निधी शहराच्या विकासासाठी दिले आहेत. कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू देणार नाही. शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सुधारित विकास आराखडा शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगत अनधिकृत इमारत नियमधीन करण्यासाठी जादा चटई क्षेत्र आणि शासकीय मूल्य कमी केले आहे.”

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानेश्वर म्हात्रे हे उपस्थित होते. आयुक्त अजीज शेख यांनी उल्हासनगर लगतच्या शहरातून एक्सप्रेस वे जात असल्याने शहरातील वाढत्या वाहतुकीच्या प्रश्न सोडविण्यासाठी फ्लाय ओव्हरचे जाळे उभारण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी होकार दर्शविला.

हरिद्वार एक्सप्रेस पुन्हा सुरू

उल्हासनगरमधील प्रसिद्ध थायरासिंग दरबारच्या जवळपास पाच हजार श्रद्धाळू दर मार्च महिन्यात हरिद्वार येथे हरिद्वार एक्सप्रेसने जात असतात. ही एक्सप्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केली होती, त्यामुळे नाराजी पसरली होती. ही एक्सप्रेस पुन्हा सुरु केल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाहीर करताच शहरवासीयांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी थायरासिंग दरबारचे भाईसाहेब जसकीरत सिंग आणि भाईसाहेब त्रिलोचन सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी यांचे आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button