पुणे : सड्यावरील जीवसृष्टीबद्दल अनास्था; डॉ. अपर्णा वाटवे यांचे प्रतिपादन

पुणे : सड्यावरील जीवसृष्टीबद्दल अनास्था; डॉ. अपर्णा वाटवे यांचे प्रतिपादन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या वैशिष्ट्यांमध्ये सडे या नैसर्गिक अधिवासाला मानाचे स्थान आहे. जांभा दगडाचे विस्तीर्ण पठार म्हणजे सडे. मात्र, सड्यावरील जीवसृष्टीबद्दल सरकारदरबारी पूर्ण अनास्था आहे. सरसकट सगळ्या सड्यांची नोंद पडीक जमीन-पोटखराबा म्हणून वेस्टलँड म्हणून सरकारी नकाशात केली गेली आहे. मोठाले ऊर्जा प्रकल्प, खाणी, शहरीकरण, अणुऊर्जा, कारखाने या सार्‍यातून विकासाचे गाजर दाखवून साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरून सडे अधिकृतरीत्या बड्या विकसकांच्या हाती दिले जात आहेत, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत प्रसिद्ध जैवविविधतातज्ज्ञ डॉ. अपर्णा वाटवे यांनी व्यक्त केले.

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे आयोजित 16 व्या ऑनलाइन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आयोजित विशेष वार्तालाप कार्यक्रमात अपर्णा वाटवे बोलत होत्या. या वेळी महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, आरती कुलकर्णी, स्वप्निल कुंभोजकर, अनुप जयपूरकर, माधवी कोलते उपस्थित होते. या महोत्सवानिमित्त तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध— प्रदेश येथे तृणधान्यांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहज समृध्दा या संस्थेस 'वसुंधरा मित्र संस्था' पुरस्कार, तर फिल्म मेकर' पुरस्कार डी. डब्ल्यू. इको इंडिया या पर्यावरणविषयक व्हिज्युअल (दृक्श्राव्य) मॅगझीनला देण्यात आला.

डॉ. अपर्णा वाटवे म्हणाल्या की, सह्याद्रीच्या माथ्यावर आणि कोकणपट्टीत साधारणत: 4-5 कोटी वर्षांपूर्वी सडे तयार झाले आहेत. घाटमाथ्यावरील सडे पाचगणी, महाबळेश्वर, कास, मसाई, आंबोलीचे सडे येथे दिसतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सडे खाडीकाठी तयार झाले आहेत. यावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि प्राणिसमूह उत्क्रांत झाले आहेत.

ते जगात इतर कुठेही दिसत नाहीत. मातीच्या अभावामुळे येथे बारमाही वनस्पती फारशा आढळत नाहीत. शेवाळे, लायकेन, बुरशी, मॉस, नेचे आणि सपुष्प वनस्पतींची जैवविविधता सड्यांवर दिसते. यात अंदाजे 100 प्रदेशनिष्ठ प्रजातींची नोंद झाली आहे. पावसाळ्यात सड्यावरील खळग्यांमध्ये पाणी साचून जलवनस्पती, देवभाताचे झुबके वाढतात. लाखो पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी आणि जांभळी फुले फुलतात. तर्‍हेतर्‍हेच्या माश्या, मधमाश्या, भुंगे, फुलपाखरे या फुलांना भेट देतात.

हे कीटक आजूबाजूच्या फळबागा, भाजीपाला, कडधान्यांच्या पिकालाही बीजनिर्मितीत मदत करतात. सड्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात कीटकभक्ष्यी वनस्पती आढळतात. मासे, बेडूक, सापसुरळी, विंचू आणि इतर कीटक सड्याच्या भेगाभेगांतून दिसतात. कोकणातील ढोकाचे फूल आणि घाटमाथ्यावरील वायतुरा या सड्यावरील प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा समावेश जागतिक धोकाग्रस्त लाल यादीमध्ये झाला आहे. सडे टिकले तरच या वनस्पती टिकतील. आंबोली तोड, डोरले पाल असे प्राणीही लाल यादीत नोंदले गेले आहेत. एकूणच, सडा हीच एक संकटग्रस्त परिसंस्था किंवा संकटग्रस्त अधिवास आहे, असे आता लक्षात आले आहे असे त्यांनी सांगितले. गौरी किर्लोस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news