पानशेत भागासाठी भरघोस निधी देणार; आमदार संग्राम थोपटे यांचे आश्वासन
वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरणभागातील शिरकोली, टेकपोळे, माणगाव, खाणु, चांदर, घोल, कुर्डुवाडी, दापसरे आदी अतिदुर्गम खेड्यापाड्यांत मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी शिरकोली (ता. वेल्हे) येथे विविध विकासकामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. शिरकोली येथील शिवकालीन श्रीशिरकाई मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आ. थोपटे यांनी देवस्थानला तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळावा तसेच भाविकांसाठी विविध सेवा-सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
यावेळी शिरकोलीचे सरपंच व देवस्थानचे सचिव अमोल पडवळ यांच्या हस्ते आमदार थोपटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. शिरकोली ग्रामपंचायत कार्यालय, नळ पाणीपुरवठा योजना, माणगाव-पोळे नळपाणी, खानू येथे विद्युतीकरण, दिघेवस्ती रस्ता व नळ पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आ. थोपटे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे, शिवाजी चोरघे, दिनकर बामगुडे, नामदेव पडवळ, रामभाऊ पडवळ, उपसरपंच माऊली साळेकर, सचिन साळेकर, धोंडीबा मरगळे, दीपक मरगळे, शंकर पडवळ, अंकुश पोळेकर, संदीप पडवळ, नंदू पासलकर, बाळासाहेब आढाव, विनायक कांबळे आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

