ठाणे : खोणी गावच्या हद्दीत रोपांची नासधूस | पुढारी

ठाणे : खोणी गावच्या हद्दीत रोपांची नासधूस

नेवाळी (ठाणे) : पुढारी वृत्तसेवा : कल्याण येथील उंबार्ली खोणी टेकडी परिसरातील रोपांची काही समाज कंटकांकडून नासधूस करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी असलेला नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा फलक फाडून टाकण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली आहे. यापूर्वीही उंबार्ली टेकडी परिसरात आग लागून झाडांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता तर रोपच उपटून टाकण्यात आले आहेत. या गोष्टी जाणूनबूजुन केल्या जात असल्याचे पर्यावरण प्रेमींनी माहिती दिली.

कल्याण ग्रामीण भागातील उंबार्ली टेकडी ही डोंबिवली शहराचा ऑक्सिजन झोन म्हणून ओळखली जाते. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे. डोंबिवली जवळील हा उंबार्ली टेकडीचा परिसर वनराईने नटलेला आहे. या टेकडीवरील वृक्ष संवर्धन करण्यासाठी खोणी, दावडी, सोनारपाडा गावातील ग्रामस्थांसह अनेक संस्था आज कार्यरत आहेत.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पर्यावरण प्रेमी, वन विभाग यांच्यावतीने या टेकडीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्ट्यांचा सदुपयोग करत स्वयंसेवकांनी सकाळ संध्याकाळ काम करत या परिसरात वृक्ष संवर्धनासाठी नैसर्गिक तळी, पाण्याच्या टाक्या बसवून पाणी पुरवठा टेकडीवर केला आहे. सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी या वृक्षांची देखभाल करतात.

गेल्या काही वर्षांपासून या टेकडीवर वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपांची समाज कंटकांकडून नासधूस करण्यात आल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. उंबार्ली टेकडीवरील खोणी गावाजवळील बाजूस नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा फलक असून या ठिकाणी रोपांची लागवड करण्यात आली आहे.

हा फलक फाडून टाकत त्या ठिकाणी रोपे उपटून टाकण्यात आली आहेत. मात्र या समाजकंटकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. ऊन वारा पाऊस काहीही न पाहता वृक्षांचे संगोपन करणाऱ्या सदस्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आता यावर शासनाने कठोर कारवाई करावी असे सर्व सदस्यांनी मागणी केली आहे.

तसेच यापूर्वी देखील याबाबत तक्रारी करण्यात आल्‍या होत्‍या. परंतु यावर अद्याप कोणतेही कारवाई झाली नाही. आणि आता शासनाकडून काय कारवाई केली जाणार? असा सवाल सदस्यांनी केला आहे.

.हेही वाचा 

पिंपरी : महापालिका अर्थसंकल्प लांबणीवर पडणार

वसमत बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड

पुण्यातील अघोरी प्रथेच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल; तातडीने कारवाई करण्याचे आदेश

 

Back to top button