ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी वज्रेश्वरी तीर्थक्षेत्र परिसर सज्ज | पुढारी

ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी वज्रेश्वरी तीर्थक्षेत्र परिसर सज्ज

अंबाडी; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या काही तासांवर आलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी परिसर सज्ज झाला आहे.

वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अकलोली या तीर्थक्षेत्र परिसरात सरत्या वर्षाला नाच गाणी करीत निरोप देण्यासाठी आणि पवित्र गरम पाण्याच्या कुंडांमध्ये स्नान करून वज्रेश्वरी देवीचे आणि भगवान नित्यानंद स्वामी समाधी मंदिराचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येथे हजारो भाविक आणि पर्यटक दरवर्षी येत असतात.

त्यादृष्टीने येथील हॉटेलचालक, रिसॉर्ट, लॉज सज्ज झाले आहेत. यासाठी त्यांनी आकर्षक रोषणाई करीत आगाऊ ग्रुप बुकिंग चालू केली आहे. तर दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक दर्शनासाठी येणार त्यामुळे वज्रेश्वरी आणि गणेशपुरी देवस्थाननेही तयारी पू्र्ण केली आहे. स्थानिक गणेशपुरी पोलीस ठाण्याने अंबाडी नाका आणि वज्रेश्वरी या ठिकाणी नाकाबंदी ठेवली असून हॉटेल, ढाबाचालक, रिसॉर्ट या ठिकाणीही पोलिसांची गस्त असणार आहे.

अकलोली कुंड येथे अधिकचा बंदोबस्त तैनात केला असून पोलिस रात्रीपासून पहाटेपर्यंत गस्त घालणार आहेत. यासाठी गणेशपुरी पोलीस ठाण्याचे चार अधिकारी आणि १२ कर्मचारी नियुक्त केले आहेत. भाविक, पर्यटकांनी या ठिकाणी आल्यावर जास्त हुल्लडबाजी न करता नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन गणेशपुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button