KDMT : ‘केडीएमटी’ची अवस्था दयनीयच स्वतःच्या थांब्यावर उभे राहणेही झाले कठीण ! | पुढारी

KDMT : 'केडीएमटी'ची अवस्था दयनीयच स्वतःच्या थांब्यावर उभे राहणेही झाले कठीण !

 भाग्यश्री प्रधान-आचार्य : डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरात अनेक दिवस रिक्षा आणि कल्याण डोंबिवली परिवहन मंडळामध्‍ये (KDMT) वाद पाहायला मिळत आहे. मात्र आता चक्क शेअर टॅक्सी चालकांनी ‘केडीएमटीचा’च खांबा अडवला आहे. कोणत्याही परिस्थितीत केडीएमटीची डोंबिवली स्थानक ते लोढा पलावा ही बस या थांब्यावर उभी करून देणार नाही, असा पवित्राच या टॅक्सी चालकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे बसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नुकतीच धुकधूकी आलेल्या ‘केडीएमटी’ला टॅक्सी चालकांची दादागिरी आणि प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

KDMT बससेवा बंद होण्याचे मुख्य कारण रिक्षा चालक मालक संघटना आहेत, अशी ओरड कायमच होत असते. अनेक दिवस डोंबिवली – पनवेल किंवा डोंबिवली स्थानक ते पलावा या परिवाहनाच्या बसेस बंद होत्या. सध्या त्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र आता डोंबिवली स्थानकात केडीएमटीच्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या शेअर टॅक्सी चालकांनी आपला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. गेले अनेक वर्षे आम्ही येथे डोंबिवली ते पलावा असा शेअर टॅक्सी चालवतो. आता बस सुरू झाल्या असून आम्ही ज्या जागेत उभे असतो त्याच ठिकाणी परिवाहनच्या बस येतात. त्यामुळे केडीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी आमच्या पोटावर पाय मारत असल्याचा आरोप ते करत आहेत. दुसरीकडे त्याच थांब्यावर पनवेलला जाणाऱ्या बसची वाट बघत दोन-दोन तास प्रवासी खोळंबत आहेत. त्यामुळे अद्यापही ‘केडीएमटी’चे वेळापत्रक कोलमडले असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे टॅक्सी चालकांची समजूत पालिका अधिकारी नेमकी कशी घालणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Back to top button