‘छ. राजाराम साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करा अन्यथा प्रशासक नेमा’ | पुढारी

'छ. राजाराम साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करा अन्यथा प्रशासक नेमा'

कसबा बावडा (कोल्‍हापूर) : पुढारी वृत्तसेवा : श्री छ. राजाराम कारखाना विद्यमान संचालकांची मुदत संपून पावणे तीन वर्ष झाली, शेतकऱ्यांचे हित पाहून कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ताबडतोब सुरू करा, जर निवडणुकीला उशीर होत असेल तर, कारखान्यावर प्रशासक नेमा अशी मागणी कारखाना सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे मंगळवारी केली.

छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २० एप्रिल २०२० रोजी संपली आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवत शेतकऱ्यांचे हित पाहून कारखान्याची निवडणूक जाहीर करा, अशी मागणी कारखाना सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे यांच्याकडे केली आहे. कारखान्याच्या काही सभासदांनी केलेल्या तक्रारीनुसार कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र ठरले. याची भीती कारखाना व्यवस्थापनामध्ये असून, निवडणूक लागल्यास सत्ता जाईल या भीतीपोटी कारखान्याची निवडणूक जाहीर केली जात नसल्याचा आरोप माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी यावेळी केला.

कारखान्यात मनमानी कारभार होत असल्याने, प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी आदेश देऊनही गेले दीड महिना व्यवस्थापन ‘ब’ वर्ग सभासदांची यादी देत नाही. याबाबत शिष्टटमंडळातील सभासदांनी जोरदार आक्षेप नोंदवला. येत्या शुक्रवारपर्यंत कारखाना व्यवस्थापनाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे ‘ब’ वर्ग सभासदांची यादी न दिल्यास सोमवारी, प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने, जयसिंग ठाणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, श्रीराम संस्थेचे सभापती हिंदुराव ठोंबरे, राजीव चव्हाण यांच्यासह करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील राजाराम कारखान्याचे सभासद, श्रीराम संस्थेचे संचालक उपस्थित होते. 

.हेही वाचा 

Sushant singh Rajput Case : सुशांतच्या मृतदेहावर…, शवागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : बदलते शिक्षण : ‘ग्लोबल व्हिजन’

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणारी के. के. वाघ शैक्षणिक संस्था

Back to top button