ठाणे : राजकीय आदेश आल्‍याने टीएमटी बंद करण्यात आली; ठाणे परिवहन | पुढारी

ठाणे : राजकीय आदेश आल्‍याने टीएमटी बंद करण्यात आली; ठाणे परिवहन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : सुषमा अंधारे यांच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षानेही पाठिंबा दिल्याने या बंदचा परिणाम ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेवरही दिसून आला. सकाळपासून ठाणे परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावली याही. यामूळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले. एक राजकीय आदेश आला आणि परिवहन सेवा बंद करावी लागली, अशी माहिती परिवहनकडून देण्यात आली. ठाणे परिवहन सेवेवर मोठ्या संख्यने प्रवासी संख्या अवलंबून असल्याने एका दिवसांत परिवहन सेवेला १५ लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

ठाणे शहराच्या लोकसंख्येनुसार शहराला ६०० बसची आवश्यकता आहेे परंतु सध्या सुमारे ३२४ बस रस्त्यावर धावतात. त्यातून परिवहनला २५ ते २७ लाखांचे उत्पन्न रोजच्या रोज मिळत आहे. कोरोनामध्ये परिवहनचे कंबरडे मोडल्याचे दिसून आले. शेकडो बस भंगारात काढण्यात आल्या. कोरोनानंतर परिवहन सेवा आता कुठे सावरतांना दिसत आहे; परंतु असे असताना शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये परिवहन सेवेने देखील आपली सेवा बंद ठेवल्याचे दिसून आले.

परिवहनच्या ३२४ बसपैकी एकही बस शनिवारी रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे सकाळच्या सत्रात कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सॅटीसवर उभ्या असलेल्या हजारो प्रवाशांना बसची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागले.  रिक्षा देखील बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.

एकीकडे एसटी, बेस्ट, नवीमुंबई महापालिका व इतर प्राधिकरणाच्या बस ठाण्यात येत होत्या. परंतु ठाण्याचीच परिवहन सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. परिवहन सेवा ही सार्वजनिक वाहतुक सेवा असल्याने ती चालू ठेवणे गरजेचे होते. परंतु तरी देखील ती कोणाच्या सांगण्यावरुन बंद ठेवण्यात आली, असा सवाल प्रवाशांनी केला. आम्हाला आदेश आले आणि आदेशाचे पालन आम्ही केले असल्याचे असे परिवहनकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :  

 

Back to top button